पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अम्बेसिडरपदी दिलीप वेंगसरकर आणि सागर म्हात्रे

13 Oct 2022 15:07:06
5
 
पनवेल | यावर्षीच्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण’ मध्ये पनवेल महानगरपालिकेने अत्यंत उत्साहाने सहभागी होत , पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमेच्या जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अम्बेसिडरपदी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
 
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत’ स्वच्छ सर्वेक्षण 2.0 सुरू करण्यात आले आहे. शहर स्वच्छ रहावे , नागरिकांना स्वच्छतेची सवय व्हावी, घन कचरा व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने व्हावे, शौचालयांची स्वच्छता अशा अनेक कार्यक्रमांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाच्यासवतीने ‘स्वच्छ भारत’ हे अभियान राबविले जाते. पनवेल महानगरपालिका सातत्याने ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणामध्ये वरचा क्रमांक पटकावते आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेमध्ये आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेला 5 वा क्रमांक प्राप्त झालेला आहे .
 
तसेच देशपातळीवर 382 शहरांमध्ये 17 वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे 3 स्टार व हागणदारी मुक्त शहराचा जऊऋदर्जा प्राप्त आहे. महापालिका स्थापनेपासून उत्तोरोत्तर प्रगती करत यावर्षी सर्वोत्तम क्रमांक प्राप्त केला आहे. पुढीलवर्षी यावर्षीपेक्षा अधिक चांगले यश महापालिकेस मिळावे यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. यावर्षीच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमे अंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
 
या अंतर्गत ‘स्वच्छता के दो रंग हरा गिला, सुखा निला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे महापालिकेस मदत करणार आहेत. याचबरोबरीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे महापालिकेस सहकार्य करणार आहे. यांच्या मदतीने महापालिका स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0