माणगाव नगरपंचायत निवडणूक : ‘त्या’ 4 जागांसाठी 16 अर्ज दाखल

04 Jan 2022 13:38:37
mangaon nagar panchayat
 
माणगाव (सलीम शेख) । येत्या 18 जानेवारी रोजी माणगाव नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत 4 जागांसाठी 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व अर्ज आज (4 जानेवारी) झालेल्या छाननीत वैध ठरले असल्याची माहिती निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांनी दिली.
 
माणगाव नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून 17 नगरसेवक पदांची संख्या आहे. या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जागांकरिता मंगळवार दि.21 डिसेंबर 2021 रोजी उत्स्फूर्तपणे मतदान झाले. उर्वरित वार्ड क्र.6, वार्ड क्र.8, वार्ड क्र.14, वार्ड क्र.17 या चार वार्डातील निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 21 डिसेंबरला मतदान घेण्याबाबत स्थगिती देण्यात आली होती.
तद्नंतर ओबीसींच्या या सर्व जागा सर्वसाधारण जागेतून लढविल्या जाव्यात, असे आदेश न्यायालयाने देऊन त्यानंतर तसे आरक्षण निश्चित करून या चार जागांच्या निवडणुका 18 जानेवारी 2022 रोजी घोषित केल्या. या 4 जागांसाठी माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस, माणगाव विकास आघाडी, मनसे, अपक्ष अशा एकूण 16 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
 
त्यामध्ये वार्ड क्र.6 मधून हर्षदा सतीश सोंडकर, संजना संतोष काळे, स्नेहा नितीन दसवते, अंजली ज्ञानदेव पवार, वार्ड क्र.8 मधून नंदिनी नितीन बामगुडे, सुरेख सुहास दांडेकर, चेतना मंगेश निंबाळकर, वार्ड क्र.14 मधून मयूर दिलीप शेट, सचिन मारुती बोंबले, राजा गौरू भोनकर, स्मिता सचिन बोंबले, मनोहर नरसीदास मेहता, वार्ड क्र.17 मधून दिनेश बाळकृष्ण रातवडकर, यासिन महम्मद परदेशी, महामूद फकरुद्दीन धुंदवारे, रवींद्र भिकू मोरे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 
या चार जागांच्या मतदानानंतर 19 जानेवारी रोजी सर्वच 17 वार्डांतील मतमोजणी होऊन त्यानंतर माणगाव नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? हे स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0