दुकानात घुसून रोकड चोरली; दोघांना अटक

कर्जत बाजारपेठेतील घटना

By Raigad Times    04-Jan-2022
Total Views |
chori
 
 
कर्जत । कर्जत बाजारपेठेतील भाजी मार्केटमधील महालक्ष्मी दूध डेअरी आणि कोल्ड्रिंक्सच्या दुकानात घुसून दोन चोरट्यांनी 40 हजारांची रोकड लंपास केली. या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेण्यात कर्जत पोलिसांना यश आले असून, त्यांच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
कर्जत शहरात भाजी मार्केटमध्ये धाकटे वेणगाव येथे राहणार्‍या स्थानिकांचे महालक्ष्मी दुध डेअरी अँड कोल्ड्रींक्स हे दुकान आहे. 1 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उल्हासनगर आणि कर्जत बुद्धनगर येथे राहणार्‍या दोघांनी दुकानात घुसून फ्रिज ढकलून देत त्या दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे 40 हजारांची रोकड लंपास केली.
 
 
जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या चोरट्यांनी दुकान मालक यांना तेथील बाटल्यांनी मारहाण करुन त्यांना दुखापत केली. त्यामुळे ते दोघे तेथून पसार झाले. कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे हे करीत आहेत.