नैसर्गिक संसाधनांनी बनविलेल्या माती, कुड व बांबूच्या घरांना पसंती;

कृषी व इको टुरिझमसाठी अधिक मागणी

By Raigad Times    22-Jan-2022
Total Views |
kudachya gharana magni 1 
 
पाली | जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये आजही मातीची घरे पहायला मिळत आहेत. तर आदिवासी वाड्यापाड्यांवर कुडाची घरे दिसतात. मात्र नैसर्गिक संसाधने वापरून बनविलेल्या या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि अशा प्रकारे घरे बांधणाऱ्या करागिरांची मागणी देखील वाढली आहे. शहरातील अनेक लोक व तरुण देखील अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. पैसे खर्च करून या गोष्टींचा अनुभव घेतांना दिसत आहेत.
 
 
kudachya gharana magni 2
 
मागील महिन्यात सुधागड तालुक्यातील इको आर्किटेक्ट तुषार केळकर यांनी भेरव येथे एका इकोटुरिझम उपक्रमासाठी मातीची, कुडाची, बांबू व लाकडाची अशा विविध प्रकारची घरे बनवली आहेत. या आधी कोलाड येथे एका कृषी पर्यटन केंद्रमध्ये देखील बांबू व कुडाची घरे बनवली आहेत. जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या कृषी व इको टुरिझम केंद्रांमध्ये अशा स्वरूपाची घरे बांधण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण जीवनशैली, आरोग्यपूर्ण व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव शहरातील लोक घेत आहेत. शिवाय यातून कृषी व इकोटुरिझमला चालना देखील मिळत आहे. याशिवाय अनेक फार्महाऊसवाले देखील आपल्या शेतात अशा प्रकारची घरे बांधण्यास पसंती देतात. सुधागड, कर्जत, माणगाव अशा जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशी घरे बांधलेली दिसतात.
 

kudachya gharana magni 3
 
कुडांचे घर बांधण्यासाठी सर्वात महत्वाची साधनसामर्गी म्हणजे कारवीच्या काठ्या आणि माती. जंगलातून कारवीच्या लांब काठ्या तोडून आणल्या जातात. मग दगडी व मातीच्या पायावर कारवीच्या काठ्या उभ्या करुन बांधल्या जातात. त्यावर मातीचा आणि शेणाचा मुलामा दिला जातो. या कामासाठी कुशल हातांची व अनुभवाची गरज असते. मात्र बनविण्यास वेळही खुप लागतो. घराच्या मध्यावर व बाजुने असलेल्या लाकडी खांबांवर लाकडाचे आडवे खांब टाकुन त्यावर कौले किंवा ढापे रचले जातात. आतील जमीन चांगली चोपून शेणाने सारवली जाते. बाहेर छानसी पडवी काढली जाते. कि झाले कुडाचे कौलारू घर तयार. अशाच प्रकारे बांबूचे घर बनविण्यात येते. मातीच्या घरामध्ये भिंती विटांच्या उभारून त्याला मातीचा लेप चढवला जातो किंवा तशाच ठेवल्या जातात. यावर नैसर्गिक कावेचा मुलामा चढविला जातो. चुण्याच्या साहाय्याने वारली चित्रकला किंवा नक्षीकाम करून अधिक आकर्षक बनवितात.
 
कुडाच्या, मातीच्या व बांबूच्या घरांना इकोटुरिझम व कृषी पर्यटनासाठी खूप अधिक मागणी आहे. शिवाय नैसर्गिक संसाधनांचा वापर होत असल्याने खर्च देखील कमी येतो. मात्र तंत्रशुद्ध पद्धतीने अशी घरे बांधणारे खुप कमी कारागीर येथे आहेत. स्वतः अनेकांना याचे प्रशिक्षण देतो. परदेशातून देखील अनेकजण शिकण्यासाठी येतात. तसेच मागणी प्रमाणे बांधून देखील देतो.
तुषार केळकर, इको आर्किटेक्ट, उद्धर
 
पूर्णतः आरामदायी व नैसर्गिक
कारवीच्या काठ्यांना माती व शेण थापून तयार केलेल्या भिंती, तसेच मातीचे व बांबूच्या कौलारू छप्पर असलेल्या घरात थंडावा राहतो. उन्हाळ्यात तर ही घरे वरदानच ठरतात. शिवाय आकर्षक देखील दिसतात. मातीचा व शेणाचा वास प्रसन्न ठेवतो. प्रदूषण विरहित वातावरणात या घरांमध्ये राहण्याचा आंनद अनेकजण लुटतात. आणि त्यासाठी अतिरिक्त पैसे देखील देतात.