तंबाखू, गुटख्याची बेकायदा विक्री करणारे 7 जण गजाआड

42 लाखांच्या मालासह 4 टेम्पो केले जप्त

By Raigad Times    19-Jan-2022
Total Views |
Navi Mumbai Police
 
नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा कक्ष-3 ची कारवाई
 
पनवेल । बंदी असलेला सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या साठ्यासह चार टेम्पो जप्त करण्यात नवी मुंबई पोलीस कक्ष-3 गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एकूण 60 लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
‘नशामुक्त नवी मुंबई’ या अभियानाच्या अनुषंगाने अंमली पदार्थ साठा, खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे कक्ष-3 गुन्हे शाखेकडून काम सुरू असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना महापे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापे एमआयडीसी परिसरात सापळा रचण्यात आला. यादरम्यान महापे एमआयडीसीमधील टाटा मोटर्स परिसरातील पी.ए.पी.ए. 202 या गोदामाजवळ चार संशयित टेम्पो दिसून आले. त्यापैकी एका टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटखा सापडला. त्यानंतर इतर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्येही विमल गुटखा भरलेला आढळून आला.
 
त्यामुळे पोलिसांनी गोदामामध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथेही गुटख्याचा साठा सापडला. सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी राहूल ताकाटे यांना तात्काळ बोलावून पंचासमक्ष 42 लाख 72 हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला (विमल गुटखा) जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारही टेम्पो ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण 60 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
 
यामध्ये इसरार अहमद नियाज अहमद शेख (वय 45, रा. भिवंडी, जि.ठाणे), सुरज हरिश ठक्कर (वय 41, रा.डोंबिवली पूर्व), सस्तु रामेत यादव (वय 34, रा. शितलगंज, उत्तर प्रदेश), नितीन बाबूराव कसबे (वय 49, रा. मुलुंड पश्चिम मुंबई), नौरुद्दीन अलिशौकत सय्यद (वय 26, रा. मानखुर्द मुंबई), मोहम्मद नफिस रफिक शेख (वय 34, रा. दहिसर मोरी, जि. ठाणे), पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव (वय 27, रा. नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
 
हे सातजण प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व एमआयडीसी पानमसाला परराज्यातून छुप्या मार्गाने कमी दराने खरेदी करायचे आणि गोदाम भाड्याने घेऊन त्याठिकाणी साठा करून छोट्या छोट्या टेम्पोद्वारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील व्यावसायिकांना जादा दराने विक्री करायचे.
 
दरम्यान, पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 3 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहायक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पोलीस हवालदार मोरे, कोळी, वाघमोडे, पोलीस नाईक पाटील, जेजूरकर, पाटील, फुलकर, जोशी, मोरे, सोनवलकर यांनी ही यशस्वी कारवाई केली.