जिल्ह्यात ४९२ गावांमध्ये १०० टक्के नळ कनेक्शन दिल्याचा जिल्हा परिषदेचा दावा

By Raigad Times    15-Jan-2022
Total Views |
water canection
 
 
अलिबाग | प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील ४९२ महसुली गावांमधील १०० टक्के घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे ही गावे हर घर जल गाव म्हणून घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 
 
विशेष म्हणजे उरण तालुक्यातील १०० टक्के म्हणजे ५४ गावांमधील सर्व घरांना नळ कनेक्शन देण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे.
जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत.
 
..............
जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात घराघरात नळ कनेक्शन देण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील ४९२ महसुली गावांमधील १०० टक्के घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या सर्व गावांना हर घर नळ गाव घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या गावांमधील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या गावांमध्ये जर कुणी नव्याने घर बांधले असेल किंवा एखादे कुटुंब कामानिमित्त तालुक्यात नव्याने स्थलांतरित असेल तर अशा कुटुंबांनी प्रशासनासोबत संपर्क साधून नळ कनेक्शन मागणी करावी, तसेच इतर गावांमध्ये ज्या कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन नाही त्या कुटुंबांना नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
 
- डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
...........
तालुका : १०० टक्के नळ कनेक्शन असलेली गावे
अलिबाग : ४२
कर्जत : २४
खालापूर : ४०
महाड : ४४
म्हसळा : ५०
मुरुड : १४
पनवेल : ६९
पेण : १७
पोलादपूर : १०
सुधागड : ११
तळा : १०
उरण : ५४
रोहा : ४५
माणगाव : ५०
श्रीवर्धन : १२
..............