श्रीवर्धनमध्ये विकासकामांचे होर्डींग फाडल्याने शिवसैनिक संतापले

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार

By Raigad Times    15-Jan-2022
Total Views |
banner
 
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामांचे शिवसेनेने लावलेले होर्डींग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावरुन शुक्रवारी (14 जानेवारी) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात केली आहे.
 
तालुक्यातील वाकलघर, नागलोली, वावेपंचतन या गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन मंजूर केल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तसे होर्डींग त्यांनी त्या परिसरात लावले होते. मात्र शुक्रवारी (14 जानेवारी) वाकलघर येथील होर्डींग काही अज्ञातांनी फाडून टाकल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले.
 
ही माहिती सर्वत्र पसरली आणि गावागावांतून शिवसैनिक एकत्र येत त्यांनी संशयित इसमांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना उपतालुकाप्रमुख अरुण शिगवण यांनी हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रार दिघी सागरी पोलीस ठाण्यात केली आहे.
 
तक्रारीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्या सांगण्यावरुन संदेश गुजर, संतोष भोगल, सुनिल चव्हाण, संदेश काते, संजय तटकरे, विजय पाडावे, सचिन विचारे यांनी वाकलघर येथील होर्डींग फाडून मोडतोड केल्याचे म्हटले आहे. या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
यावेळी उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर, सभापती बाबुराव चोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर, विभागप्रमुख गजानन कदम, शरद महाडीक उपस्थित होते. तर शेकडो शिवसैनिक दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते.