जहाजातून अवैधरित्या डिझेलची खरेदी करून त्याची विक्री करणारी टोळी जेरबंद

डिझेल व बोटिसह २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Raigad Times    15-Jan-2022
Total Views |
disel chori
 
 
पनवेल |  नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने व राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने उलवे येथील खाडी किनारी संयुक्तरित्या कारवाई करून समुद्रातील जहाजामधुन, अवैधरित्या डिझेल खरेदी करणारे व त्याची बेकायदेशीररीत्या विक्री करणाया टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ हजार ४७० लिटर (२१.४ टन) डिझेलसह डिझेलची विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २ बोटी असा एकुण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जफ्त केल्याची नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
 
 
काही व्यक्ती समुद्रात असलेल्या जहाजातून अवैधरित्या कमी किंमतीत डिझेलची खरेदी करून, त्यांची बेकायदेशीररीत्या विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा व मुबंई शिधावाटप विभागाचे नियंत्रक व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. त्यांनतर सदर पथकाने बुधवारी नवी मुंबईच्या सागरी किनारी खाजगी बोटीने टेहळणी सुरू केली. यावेळी उलवे जेट्टीपासून काही अंतरावर एक संशयास्पद बोट पुढे जात असल्याचे पथकाला आढळून आले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने सदर बोटीचा उरणच्या दिशेने जात असतांना त्याचा पाठलाग केला.
 
यावेळी सदरची बोट काही अंतरावर दुस्रया एका बोटी जवळ थांबल्याचे दिसून आले. याचवेळी पोलिसांनी दोन्ही संशयास्पद बोटीवर छापा मारून दोन्हीं बोटींची तपासणी केली. यावेळी दोन्ही बोटीच्या वेगवेगळ्या कप्प्यात एकूण १६ लाख १० हजार रुपये किंमतीचे २१ हजार ४७० लिटर डिझेल तसेच, इतर मच्छीमार बोटींना ९ हजार ३०० लिटर डिझेल पी करून मिळविलेले ६ लाख ८७ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने डिझेलसह रोख रक्कम तसेच डिझेलची साठवणूक करून विक्रीसाठी वापरण्यात आलेल्या १२ लाख रुपये किंमतीच्या दोन बोटी असा तब्बल ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सदर बोटींवर बेकायदेशीरित्या डिझेलची साठवणूक करून त्याची विक्री करणाऱया सलीम अब्दुल हमीद शेख (५०), आसिफ नेमुद्दीन वलीयनी (४६), प्रवीण पंढरीनाथ नाईक (३४), विठ्ठल धोंडीबा देवकाते (१९) आणि दत्ता धोंडीबा देवकाते (२४) या पाच आरोपींना अटक केली. हे आरोपी समुद्रातील मोठ्या जहाजातून ६० रुपये लिटर प्रमाणे डिझेलची खरेदी करून सदरचे डीझेल ७३ ते ७५ रुपये दराने विक्री करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे. सदरची कारवाई पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहपोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह भोसले, सुनिल शिंदे, सुनिल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गज्जल, हर्षल कदम यांच्यासह मुबंई शिधावाटप विभागाचे नियंत्रक कान्हुराज बगाटे, उपनियंत्रक ज्ञानेश्‍वर जवंजाळ, सहाय्यक शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे आणि शिधावाटप निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या संयुक्त पथकाने केली.