पनवेल रेल्वे स्थानक परिसरात प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ चालविण्याकरीता इच्छुकांना आवाहन

By Raigad Times    14-Jan-2022
Total Views |
prepaid auto 2
 
 
नवी मुंबई । पनवेल रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवर प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ चालविण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वस्तू व इतर प्राथमिक सेवा सुविधा पुरविणार्‍या इच्छुक नोंदणीकृत सेवाभावी संस्था/रिक्षा संघटनांकडून लेखी स्वरुपात होकार कळविण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने पनवेल रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड येथे प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ सुरु करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई सीएसटीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ सुरु करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे.
 
या प्रिपेड ऑटो रिक्षा योजनेमुळे ऑटो रिक्षा चालक तसेच प्रवासी या दोघांनाही फायदा होणार आहे. या योजनेमुळे प्रवाशांना सुरक्षित व निश्चित दरामध्ये सेवा उपलब्ध होईल. ऑटो रिक्षा चालकास विहित भाडे दरापेक्षा प्रोत्साहनपर जास्त उत्पन्न मिळेल. ऑटो रिक्षा चालकांकडून कमी अंतराचे भाडे नाकारण्याचे प्रमाण कमी होईल.
 
ऑटो रिक्षा व्यवसायाचा दर्जा उंचावून प्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत होईल. प्रवाशी व ऑटो रिक्षा चालक यांच्यामध्ये समन्वय निर्माण होईल. जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, प्रवशांची फसवणूक करणे याबाबींना या योजनेमुळे आळा बसेल. रेल्वे स्थानकावर शिस्त वाढण्यास मदत होईल.
 
24 तास सेवा देण्याकरीता किमान कर्मचारी इत्यादी प्राथमिक सेवासुविधा उपलब्ध करून प्रिपेड बुथ चालविण्याकरीता इच्छुक नोंदणीकृत सेवाभावी संस्था/रिक्षा संघटनांकडून लेखी स्वरुपात होकार कळविण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.