रोहा तालुक्यातील पश्चिम खोऱ्यातील 26 गावे होणार पाणीदार !

कुंडलिका नदीच्या दोन्ही बाजूकडील 26 गावांसाठी 100 कोटींची नळपाणी योजना मंजूर.

By Raigad Times    12-Jan-2022
Total Views |
roha news 2
 
 
ना. गुलाबराव पाटील यांनी दिले मंजुरीचे पत्र ; आम. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांना आले यश
 
रोहा | जलजिवन मिशन अंतर्गत कुंडलिका नदीच्या पश्चिम खोऱ्यातील दोन्ही बाजूकडील 26 गावांसाठी 100 कोटींची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आम. महेंद्र दळवी यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले. पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीचे पत्र नुकतेच त्यांना सुपूर्द केले असून या योजनेमुळे पश्चिम खोऱ्यातील दोन्ही तीरांवरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

roha news
 
 
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवरील उजवा तीर पडम ते धोंडखार व डावा तीर खारगाव ते कोकबन पर्यंत असलेल्या गावांची पाण्यासाठी अनेक वर्षे तडफड सुरू आहे. 26 गावातील प्रमुख कार्यकर्ते सतत जुनी पाणी योजनेद्वारे सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न करीत होते. शेणवई गावचे स्व.हेमंत देशमुख यांनी तर ही योजना कार्यान्वित होण्यासाठी जिल्हाधिकारी, रोहा उपविभागीय कार्यालय, तहसीलदार तसेच एम. जी. पी. एस. यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ऍड. मनोजकुमार शिंदे यांच्या शिष्टमंडळाने यासाठी सतत आ. महेंद्र दळवी यांच्याकडे पाठपुरावा करीत राहिले.
 
शंभर कोटी रुपायांची या पाणी योजनेसाठी सन 2021-22 च्या जलजीवन मिशन महाराष्ट्र जिवन प्राधिकरण आराखड्यामध्ये रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवरील डावा तिर व उजवा तिर 26 गावांना नळ पाणी पुरवठा योजना विशेष बाब मध्ये मंजूर करण्यात आली. त्यामुळे आता ही गावे पाणीदार होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. 11 जानेवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे ग्रामस्थ, आ. महेंद्र दळवी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन अखेर शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली.
 
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, ऑनलाईन बैठकीत पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे, उपराज्यमंत्री संदीपान भुमरे, आ. महेंद्र दळवी, ऍड. मनोजकुमार शिंदे, चणेरा विभाग प्रमुख उद्देश वाडकर, माजी सरपंच सुधाकर शिंदे, विकास पाटील, रामा शेरेकर, अविनाश पाटील व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
 
रोहा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमधील 30 गावांमधील नागरीकांना या योजनेचा फायदा होणार आहे. एप्रिल, मे, जून पर्यंत या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असते. त्यामुले या गावांमध्ये पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे होते. याआगोदर 26 गाव पाणी पुरवठा योजना अस्तित्वात होती मात्र या योजनेत सुरुवातीला नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नंतर मात्र जवळच्या गावागावातील नागरीकांनी जागोजागी वैयक्तिक नळ जोडणी केल्याने लांबच्या गावांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होत गेला.
 
मात्र आता असे न करता 26 गावात पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, नळ असे सेप्रेट योजनेचे स्वरूप आहे त्यामुळे आता पाणीपुरवठा अखंडितपणे सुरू राहणार आहे. ऍड.मनोजकुमार शिंदे व त्यांच्या शिष्टमंडळाने पुढाकार घेतल्याने मार्च अखेर पर्यंत या योजनेचे भूमिपूजन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.