व्हेल माशाची उलटी विकणार्‍या मुरुड येथील तिघांना अटक

11 Jan 2022 16:50:57
vhel news
 
मुरुड | व्हेल माशाची उलटी (अँबरग्रीस) विकण्यासाठी आलेल्या तिघांना काशिद येथे अटक करण्यात आली आहे. पाच किलो वजनाच्या या उलटीची किंमत सुमारे ५ कोटी इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
 
मुरुड तालुक्यातील काशिद येथील व्हेल माशाची उल्टी (अँबरग्रीस) विकण्यासाठी तिन इसम येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काशिद येथे जाऊन सापळा रचून तिघांना अटक केली आहे.
 
दर्पण रमेश गुंड (रा.मजगाव, मुरुड), नंदकुमार खंडू थोरवे (रा.नांदगाव ता.सुधागड), राजेंद्र जनार्दन ठाकूर (रा.मजगाव, मुरुड) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे पाच कोटी रुपये किमतीची एकूण ५ किलो ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. दोन मोटारसायकलदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
 
याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४९ (ब), ५१, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहायक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर, पोलीस हवालदार चिमटे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस नामदार जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Powered By Sangraha 9.0