कर्जत | अतिप्रचंड पर्जन्यवृष्टी होणार्या माथेरान मधील सर्व प्रेक्षणीय स्थळांकडे जाणार्या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे दरवर्षी मातीची धुप होऊन गटारे, मोर्या आणि रस्ते अनेक ठिकाणी वाहुन जात पॉईंटस नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्यासाठी माथेरान नगरपरिषदेने ही बाब ध्यानात घेऊन माथेरानला गटारे, मोर्या, रस्ते, प्रेक्षणीय स्थळे वाचविण्यासाठी, पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी कार्य हाती घेतले. सन २००५ रोजी झालेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे अनेक महत्वाचे पॉईंट्स आणि तेथील अनेक रस्ते खचून नामशेष झाले होते. यातील माथेरानमधील पॉईंट्सचा राजा म्हणून ज्या पॉइंटची ओळख होती, तो पॉइंट म्हणजे ’ पॅनोरमा हा पूर्णपणे नामशेष होत चाललेला पॉइंटचे नुतनीकरण हे पर्यावरणदृष्ट्या सुशोभित करण्यात आला आहे.
माथेरानच्या प्रवासात सुरुवातीला असलेले मायरा पॉइंट आणि हार्ट पॉइंट हे पण नामशेष झाले होते. हे पॉईंट पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभे राहिले आहेत, त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. माथेरानला एकूण बदलाच्या वाटचालीत एमएमआरडीएने नगर परिषदेला मोठा निधी दिला आहे आणि त्याच माध्यमातून एकूण १५ प्रेक्षणीय स्थळांची रूप बदलते आहे. तसेच आगामी काळात ही बाकी राहिलेले पॉईंट्स टप्याटप्याने विकसित करण्यात येणार आहेत. परंतु कोकणात आढळणार्या जांभा दगडाने हे सर्व पॉईंट नवीन रुल धारण करून पर्यटकांच्या दिमतीला हजर झाले आहेत. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी म्हणून अभ्यासपूर्ण कार्य माथेरानला शिस्तीने केले.

वेळोवेळी पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या भरीव निधीचा उत्तम प्रकारे सदुपयोग करुन घेतला. प्रेक्षणीय स्थळांचा पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी, तेथे पर्यटकांना सुखसोयी मिळण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी एकूण १५ पॉईंट्स सुशोभित करण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक विभागातले नामशेष होऊ पाहणारे आणि मुख्य पॉईंट्स पुनरुज्जीवित करण्यात येत आहेत. हे पॉईंट्स अजुनही प्रेक्षणीय करण्यात येत आहेत. माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि पालिका यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे तसेच माथेरानचे पर्यटन दूत आदेश बांदेकर यांच्यामुळे पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मिळाला आहे.
माथेरान येणारे पर्यटक यांच्यासाठी सात पॉइंट सर्कल पर्यटकांच्या पर्यटनाचे दृष्टीने महत्वाचे आहे. त्यातील चार पॉईंट्स विकसित होत असून यात रामबाग पॉइंट, बिग चौक पॉइंट, बेल्वेडियर पॉइंट आणि वन ट्री हिल या पॉइंटचा समावेश आहे. वन ट्री हिल सोडून बाकी तीन पॉइंटचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी लॉर्डस पॉइंट, एक्को पॉइंट, हनिमून पॉइंट, मलंग पॉइंट, कोरोनेशन पॉइंट, मालडुंगा पॉइंट, मंकी पॉइंट, खंडाळा पॉइंट,आदी प्रेक्षणीय स्थळांचा दरवर्षी होणारा र्हास आता होणार नाही असे दिसून येत आहे.
त्यात या प्रेक्षणीय स्थळांना शिवसेनेच्या कार्यकाळात जणू काही नव्यानेच जन्म मिळाला आहे. त्यात ते नयनरम्य आणि प्रेक्षणीय होत आहेत. यातप्रामुख्याने मुख्य रस्त्याहून पॉईंटला जाणार्या रस्त्याच्या बाहेर प्रत्येक पॉइंटवर आकर्षक घोडा स्टॅण्ड हे पर्यटकांना घोड्यावरुन व्यवस्थित उतरायला व घोड्यावर बसायला बांधलेले आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे आबालवृद्धसुध्दा घोड्यावर स्वार होऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा, घनदाट जंगलातील रस्त्यावरून घोड्यावर स्वार होऊन रपेट मारण्याचा आनंद घेत आहेत.
मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाण्यासाठी काही ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकचे तर काही ठिकाणी जांभा दगडाचे खड्डेविरहित तसेच धुळविरहित सुबक रस्ते बनविण्यात आले आहेत. पॉईंटला जाताना पाण्याच्या योग्य निचरा होण्यासाठी बाजूला गटारे, मोर्या, रेलींग बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे माथेरानला होणार्या जोरदार पर्जन्यवृष्टीचे पाणी व्यवस्थितपणे या गटारांतून व मोर्यांतून वाहुन जाईल, त्यावेळी रस्ते हे मातीधुप आणि वृक्षांची मुळांपासून पडझडदेखील थांबणार आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षांना आधार, वृक्ष जतन व वृक्षसंवर्धन म्हणून दगडी पार तसेच दरड कोसळू नये व मृदा संधारण होण्यासाठी गॅबियन वॉल बांधुन वृक्षांच्या मुळांना भक्कम आधार देण्यात आला आहे. त्याचवेळी पर्यटकांसाठी पॉईंट्सला जाणार्या रस्त्यांवर पर्यटकांना काळोखात प्रवास करताना प्रकाश दिसावा यासाठी पथदीवे आणि सोलर दिवे लावण्यात आले आहेत. तर धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या जीवन सुरक्षिततेसाठी पॉईंट्सला संरक्षक रेलींग (कठडे) लावले आहेत. त्याचवेळी पॉईंट्सला नयनरम्य देखावे पाहण्यासाठी व चालून थोडासा क्षीण वाटत असेल तर पर्यटकांना बसण्यासाठी सुबक बाकडे बसविण्यात आले आहेत. तर माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी महत्वाची गरज असलेले सुलभ शौचालयही त्या त्या मुख्य पॉईंट्सच्या बाहेर जवळपास बांधण्यात आले आहेत.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २०२० मध्ये महत्वाचा सहा महिन्यांचा कालखंड वाया गेला, आणि आता ही २०२१ मध्ये ही पर्यटन जवळपास दोन महिने पुर्णपणे ठप्प आहे. माथेरानकरांचे पुर्ण जिवनमान हे पर्यटन व त्यावर आधारित व्यवसाय यावर अवलंबून आहे. माथेरानचे जवळपास ५० टक्के पॉईंट्स सुशोभित होत आहेत आणि प्रेक्षणीय होत आहेत. त्यामूळे माथेरानला राहुनही माथेरानचे पॉईंट्स न पाहणारी खुद्द स्थनिक जनतासुद्धा खुश आहे. माथेरानची अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासहित निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येत आहेत.