
कोलाड (कल्पेश पवार) । गणपती उत्सवासाठी चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी निघाले आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने वाढल्याने, मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपतीला चाकरमानी कुटुंबासह आवर्जून येतात. उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.
आज (9 सप्टेंबर) सकाळी मोठ्या प्रमाणावर मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्याने, कोकणात जाणार्या चाकरमान्यांना आज महामार्गावरील कोलाड, वाकण फाट्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ही कोंडी फोडताना पोलिसांची कसरत पाहायला मिळाली.
बुधवारी रात्रीपासून कोलाड परिसरात वाढत्या वाहनांमुळे गुरुवारीही महामार्गावर वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली होती. मात्र चाकरमान्यांना त्रास होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस तैन्यात आहेत. पोलिसांसह स्वतः प्रवासी आपल्या वाहनातून उतरून वाहतूक सुरळीत करीत होते.
वाकण नाक्यावरही चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी बहुसंख्य वाहने पालीमार्गे वळवली. त्यामुळे पालीत वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.