वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी पर्यायी मार्ग...

By Raigad Times    09-Sep-2021
Total Views |
mangav_1  H x W
 
माणगाव पोलिसांचे नियोजन; गणेशभक्तांना सहकार्याचे आवाहन
 
माणगाव | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची टांगती तलवार असतानाही, गणेशभक्त गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. एसटी, खाजगी वाहनांतून चाकरमानी कोकणातील मूळ गावी निघाले असून, महामार्गावर वाहनांच्या रांगा आहेत. काही ठिकाणी रस्ता खराब आहे. तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. परिणामी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी पर्यायी मार्ग करण्यात आले आहेत.
 
माणगाव बाजारपेठेत ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून माणगाव पोलीस व वाहतूक पोलीस यांनी नियोजन केले आहे. मुंबई बाजूकडून येणार्‍या छोट्या वाहनांनी कोलाड, विळे, निजामपूर, बोरवाडी, पाचाड मार्गे महाड रस्त्याचा वापर करावा तसेच खोपोली, पालीकडून येणार्‍या वाहनांनी रवाळजे, विळे, निजामपूर, बोरवाडी, पाचाड मार्गे महाडकडे प्रवास करावा असे आवाहन केले आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.
 
मुंबई गोवा महामार्गावर रायगड पोलिसांचे नेटके नियोजन आणि ठिकठिकाणी पर्यायी मार्ग काढून गेली वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी रायगड पोलिसांचा ताफा महामार्गावर तैनात आहे. या नेटक्या व महामार्गावरील नियोजित बंदोबस्तामुळे प्रवास गणेशभक्तांचा सुकर होणार आहे.
 
माणगावात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस आधीच माणगाव बाजारपेठेत दुभाजक मुंबई बाजूकडून येणार्‍या वाहनांसाठी बसवून एकेरी वाहतूक तर महाडकडून येणार्‍या वाहनासाठी माणगाव बाहेर कांही अंतरावर दुभाजक बसविले आहेत.
 
कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर तसेच या मार्गाला पर्यायी रस्ते यांचा वापर करून महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी कसा करता येईल, याचे नेटके नियोजन केले आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु करून कोकणात व तळकोकणातील प्रवासी, नागरिक गणेशभक्तांना या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जेणे करून लांब पल्ल्यांच्या चाकरमान्यांना वेळेत व सुखरूप आपल्या घरी वेळेवर पोहचता येईल.
 
मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव, लोणेरे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यात माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी नियोजनबद्ध बंदोबस्त आखला आहे.
 
मुंबई गोवा महामार्ग क्र. ६६ तसेच पालीफाटा खोपोली वाकण राष्ट्रीय महामार्गा वरून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे आदी ठिकाणावरून गणेशभक्त कोकणाकडे जात असतात. त्यांचा हा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगड पोलीस सज्ज आहेत.