पालीतील नगरपंचायतीकडून खड्डे भरण्यास सुरुवात, नागरिकांना दिलासा

By Raigad Times    08-Sep-2021
Total Views |
pali 1_1  H x W 
पाली/बेणसे | ऐन सणासुदीच्या दिवसात पालीत खड्डे व तळी साचली होती. पालीकर, गणेशभक्त व सुधागड वासीय जनतेने पालीतील खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर प्रशासनाला जाग आली व खड्डे बुजवायला सुरवात केली आहे.
 
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली होती. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले होते. वारंवार मागणी केल्यानंतर अखेर मंगळवारी (दि.७) नगरपंचायत मार्फत पालीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सोमवारी (दि.६) खड्यांमध्ये वृक्षारोपण देखील केले होते. तसेच शिवसेनेने खड्डे भरण्यासाठी नगरपंचायत प्रशासकांना निवेदन दिले होते. वाहनचालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढणे जिकरीचे झाले होते. असा पार्श्वभूमीवर प्रशासनाने जणू काही आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधल्याप्रमाणे या समस्येकडे दुर्लक्ष होत होते. माध्यमांनी देखील बातम्यांच्या माध्यमातून याकडे वारंवार लक्ष वेधले आहे.
 
pali_1  H x W:
 
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात खराब रस्त्यामुळे भाविकांची व खरेदीसाठी पालीत येणार्‍या नागरिकांची खूप गैरसोय होत होती. पाली स्टेट बँक पासून गांधी चौक, महावीर मार्ग ते थेट गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आगर आळी, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळी पर्यंतचा रस्ता, भोई आळी, मिनिडोअर स्टँड ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याची भल्या मोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे.
 
त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता प्रचंड फुटला आहे. पावसाचे पाणी या खड्डयात साठल्याने वाहन चालकास खड्डयाचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन जोरात खड्डयात आदळते. त्यामुळे पाणी व चिखल पादार्‍यांच्या अंगावर उडते. खड्ड्यातील बारीक खडी पसरल्याने वाहने घसरतात. दुचाकीस्वारांना चालतांना कसरत करावी लागते. काही दिवसांपूर्वी एक शिक्षिका दुचाकीवरून खड्ड्यांत पडून जखमी झाली होती. पादचार्‍यांना येथून मार्ग काढतांना अडचणी येतात. महिला व वृद्धांची तर खूपच गैरसोय होते. खड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे. प्रत्येकजण या खराब रस्त्याबद्दल संताप व्यक्त करत होते.
 
उपाय कुचकामी
काही दिवसांपूर्वी येथील खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात बारीक खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र सततचा पाऊस आणि वाहनांची रेलचेल यामुळे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आता तरबहे खड्डे आणखी खोल व रुंद झाले आहेत. खड्यांमुळे नागरीक व वाहन चालकांची वाताहत होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करणे आवश्यक होते. काही ठिकाणचे रस्ते कित्येक वर्षे दुरुस्त देखील झाले नाहीत. आगामी येणारे सण-उत्सव पाहता लवकर पालीतील रस्ते सुस्थितीत करणे गरजेचे होते.
 
--------------------------------------------------------------------------------
आत्तापर्यंत ४ वेळा पालीतील खड्डे भरले आहेत. मात्र रोडरोलर मिळत नसल्याने पुन्हा खड्डे पडत होते. आता रोडरोलर फिरवून चांगल्या प्रकारे खड्डे भरण्यात येत आहेत. शिवाय पावसाळा संपल्यावर पालीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल. - दिलीप रायण्णावार, - प्रशासक, पाली नगरपंचायत