रायगडात कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देणार

08 Sep 2021 15:35:18
IMG-20210904-WA0161_1&nbs
 
म्हसळा | रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रायगड जिल्हा घडवायचा असून, जिल्ह्यात कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देईन, असा विश्‍वास जिल्हा कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
 
म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रविण ठाकूर, प्रदेश चिटणीस डॉ.मुईज शेख, माजी जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, माजी सरचिटणीस फझल हालडे, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर, मुरुडचे नगरसेवक विश्वास चव्हाण, नाजीम चोगले, शकूर घनसार, रफिक घरटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
महेंद्र घरत यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए .आर. अंतुले यांच्या जन्मगांव असलेल्या आंबेत येथे भेट दिली. येथे त्यांच्या मजारीवर (कबर) चादर अर्पण करुन आशीर्वाद घेतले. बॅ. अंतुले यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करण्यासाठी महेंद्र घरत सोमवारी (६ सप्टेंबर) आंबेत येथे आले होते. याप्रसंगी आंबेतमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे जोरदार स्वागत करुन त्यांना बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांची प्रतिमा भेट दिली व त्यांचा सत्कार केला.
 
आपल्या मनोगतात अध्यक्ष महेंद्र घरत यांनी, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकून अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. सर्व वरिष्ठ कार्यकर्ते, माझे सर्व सहकारी मित्र यांना विश्वासात घेऊन पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वास दिले. बॅ.अंतुले यांनी पुढील पन्नास वर्षांचा विचार करून संपूर्ण कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला. त्याचेच फलित म्हणून आज कोकणवासियांना पहायला मिळते आहे. त्यांना अभिप्रेत असलेली कॉंग्रेस पुन्हा एकदा उदयास आणण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना केले.
Powered By Sangraha 9.0