मुरुडमध्ये अतिवृष्टी : जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

साळाव चेकपोस्ट येथे दरड कोसळली, बोर्ली बाजारपेठ रात्रभर पाण्याखाली, व्यापार्‍यांचे मोठे नुकसान, येसदे मुख्य रस्त्यावर चिलख...

By Raigad Times    08-Sep-2021
Total Views |
BORLI 2_1  H x
 
मुरुड | मुरुड तालुक्यात सोमवारी रात्रीपासून ढगसदृश्य पाऊस झाला. येसदे, साळाव, सुरई हे डोंगर अक्षरशः अतिवृष्टीने पाझरले आणि पावसाच्या पाण्यासह डोंगराची लाल माती मुख्य रस्त्याकडे झेपावली. बोर्ली बाजारपेठेत या डोंगरातून आलेल्या पाणी व मातीचा निचरा होऊ न शकल्याने बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन व्यापारीवर्गाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर चिखल झाला होता. शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी यांनी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांच्यासह मंगळवारी (७ सप्टेंबर) तातडीने घटनास्थळी भेट दिली. बोर्लीतील व्यापार्‍यांना धीर देत, नुकसान भरपाई मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
 
शिरगाव ते बोर्ली या मुख्य रस्त्यावर प्रचंड वेगात डोंगरातून मातीसह पाण्याचा लोट समुद्राकडे जात होता. त्यामुळे मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. रात्री अकरा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी चार वाजेपर्यंत पावसाने या परिसरात थैमान घातले होते. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने व मोबाईल टॉवरचा संपर्क तुटल्याने बाहेरील लोकांशी संपर्क करणे कठीण झाले होते. पहाटे चारनंतर पाऊस थांबला, मात्र डोंगरातून येत असलेले पाणी व मातीचे मिश्रण दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होते.

BORLI 1_1  H x
 
अतिवृष्टीने सुरई डोंगरातून निघालेले पाणी बोर्ली बाजारपेठेत घुसले. बाजारपेठेत अंदाजे सहा फूट पाणी भरले होते व वेगाने प्रवाह सुरू होता, असे येथील प्रत्यक्षदर्शी प्रगती झेरॉक्सचे दुकानदार संदिप चिरायू यांनी सांगितले. बोर्ली बाजारपेठेतील सर्वच दुकानात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. दुकानातील फ्रिज, इलेक्ट्रीक उपकरणे, झेरॉक्स, तसेच फोटोग्राफी व्यावसायिकांचे प्रिंटर, झेरॉक्स मशीन आदीचे मोठे नुकसान झाले. येथील हॉटेल व्यावसायिकांना, किराणा दुकानदारांनाही मोठा फटका बसला आहे.
 
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर बाजारपेठ उद्वस्त झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी, जि.प.सदस्या राजश्री मिसाळ यांनी या नुकसानीची पाहणी करुन, व्यापार्‍यांना धीर दिला. एवढी भयानक परिस्थिती उद्भवूनही आपत्ती विभाग तसेच शासकीय अधिकारीवर्ग उपस्थित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते निलेश घाटवळ, भगिरथ पाटील, स्वप्तील नाखवा यांची उपस्थिती होती. निलेश घाटवळ पहाटे पाच वाजल्यापासून व्यापारीवर्गाचया मदतीसाठी धावत होते, त्यांनीच मानसी दळवी, मुरूड तहसिलदार, रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

BORLI PANCHAYAT_1 &n
 
तसेच बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी ग्रामपंचायत कर्मचारीवर्गासह प्रत्येक व्यापारी व दुकानदारांशी संपर्क केला, व तातडीने पंचनाम्यास सुरूवात केली. यामध्ये तातडीने बोर्ली बाजारपेठ व गाव यांचे १७५ जणांचे नुकसान झाल्याचे पंचनामे केले असल्याचे सांगितले, नुकसानीचा आकडा वाढेल असेही त्यांनी म्हटले. मानसी दळवी यांनी बोर्ली गावात जाऊन तेथील नुकसानीची पाहणी केली.
 
साळाव चेकपोस्टनजीक मुख्य रस्त्यालगतच्या डोंगरातून रात्री अकराच्या सुमारास डोंगरातील माती वाहून आल्याने साळाव चेकपोस्ट-रोहा व साळाव चेकपोस्ट ते मुरुड रस्ता बंद झाला होता. साळाव चेकपोस्ट पोलिसांनी तात्काळ रेवदंडा पोलिस ठाण्याशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस उ निरीक्षक विनोद चिमडा, तहसीलदार गोविंद वाकडे, नायब तहसीलदार रविंद्र सानप, हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली माती बाजूला करून दोन्ही बाजूकडील मार्ग वाहतूक खुली केली. शिरगाव नजीच्या येसदे डोंगरातूनसुध्दा माती वाहून आल्याने मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते, मात्र वाहतूक सुरळीत सुरू होती.