मुरुड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; 24 तासांत 475 मि.मी. पावसाची नोंद

अनेक घरांमध्ये शिरले पाणी...रस्ता खचला...मच्छिमार बोटींचे नुकसान

By Raigad Times    07-Sep-2021
Total Views |
Heavy Rainfall_Murud_1&nb
 
अलिबाग । मुरुड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. सोमवारी (6 सप्टेंबर) रोजी सकाळी 8 ते आज (7 सप्टेंबर) सकाळी 8 या चोवीस तासांत तब्बल 475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 
या मुसळधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील मुरुड शहर, मांडला, बोर्ली, चोरढे, माजगाव, खारीक वाडा, खारदोडकुले या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे मुरुडकरांनी रात्र जागून काढली.
 
आज सकाळी पाणी ओसरले असून, पाऊसही थांबला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सजग असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Heavy Rainfall_Murud_2&nb
 
या पावसामुळे अलिबाग मुरुड रस्त्यावरील वहूर गावाजवळ रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे या मार्गावर एका लेनने केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
 
या पावसामुळे मुरुडमधील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात शाकारुन ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून मच्छिमार बोटींची मोठी हानी झाली आहे.
 
एकदरा येथील किनारी नांगरलेल्या बोटींचे नांगर तुटून बोटी मुरुडच्या किनार्‍यावर येऊन किनार्‍यावर बांधलेल्या बोटींवर आपटल्या. काही बोटी प्रवाहात उलटल्या गेल्या. समुद्रात वाहून चाललेल्या 2 बोटी कोळी बांधवांनी अथक प्रयत्न करुन इतर बोटींच्या सहाय्याने किनार्‍यावर आणल्या. तर एका बोटीला जलसमाधी मिळाली आहे.
 
मुरुड खालोखाल श्रीवर्धन तालुक्यात 153 मि.मी. तर म्हसळा तालुक्यात 105 मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 57.06 मि.मी. सरासरीने एकूण 912.90 मि.मी. पाऊस पडला आहे.