पेण-खोपोली मार्गावर मोकाट गुरे; अपघात होण्याची शक्यता

By Raigad Times    07-Sep-2021
Total Views |
pen_1  H x W: 0
 
पेण | पेण-खोपोली मार्गावर सध्या मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. भर रस्त्यात ही गुरे ठिय्या मारून बसत असल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा वाहनांची धडक लागल्याने गंभीर जखमी होत, गुरांना प्राण गमवावे लागत असल्याच्या घटना घडत आहे. दुसरीकडे रात्रीच्या वेळी रस्त्यात बसलेल्या गुरांचा अंदाज न आल्याने वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
 
पेण-खोपोली या मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे ही प्रवाशी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. रस्त्यातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे हा मार्ग नेहमीच चर्चे त राहिला आहे. अशातच या मार्गावर मोकाट गुरांचा वावर वाढला असल्याने वाहनचालकांसह प्रवासीदेखील हैराण झाले आहेत.
 
मोकाट गुरे दिवसा व रात्री या मार्गाच्या मधोमध ठाण मांडत असल्याने जीवघेण्या अपघाती घटनांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर रस्त्यात बसलेल्या गुरांना धडकून अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुरे मालकांनी आपापली गुरे मोकळी न सोडता त्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांमधून जोर धरत आहे.
  
भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसत आहे. तर रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच अवजड वाहनांच्या धडकेत गुरांचा बळी जाण्याचीही दाट शक्यता असते. मोकाट गुरांचे मालक व शेतकरी गुरांचा वापर करून काम झाल्यावर बेफिफिकरपणे वागत आहेत. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या गंभीर झाली आहे.