अपघात! दोन मोटारसायकलींची धडक; 3 जखमी

पाली-खोपोली महामार्गावरील खुरावले फाट्यानजीक दुर्घटना

By Raigad Times    06-Sep-2021
Total Views |
Accident_Pali_Khopoli-Hig
 
पाली/बेणसे । वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून सुरु आहे. अशातच या मार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील खुरावले फाट्यानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. आज सोमवारी दि.(06) ही दुर्घटना घडली. हे तरुण पालीकडून घोडपापड येथील घरी चालले होते.
 
या अपघातात रंजित पवार, गोविंद वाघमारे, राजू पवार (रा.घोरपापड सुधागड) हे तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय-अलिबाग येथे दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मोठमोठे खड्डे, चिखल, माती, खडी, अर्धवट काम, धोकादायक वळणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सतत बदलणार्‍या ठेकेदारांनी केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पध्दतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली आहे.
 
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग पावसाळ्यात मृत्यूचा सापळा बनला आहे. क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची या मार्गावर वाहतूक होताना दिसत आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम राहिले असून चिखलात मोठी वाहने फसून अपघात होत आहेत. या मार्गावर मोटारसायकलस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर अपघात होऊन निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. आवाज उठवून, आंदोलने करुनही या मार्गाला सुगीचे दिवस येत नसल्याने जनमानसातून संताप व्यक्त होतोय.
 
वाकण पाली खोपोली मार्ग रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असुरक्षित व धोकादायक खोदकाम केले आहे. त्यामुळे दिवस व रात्री जीवघेण्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलक व कमजोर पट्ट्यादेखील तुटून पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा वाहने फसून अपघात होत आहेत.
 
वाकणपासून पाली फाटापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गाची तकलादू डागडुजी करण्यात येते, मात्र आजमितीस पुन्हा महामार्गाची ‘जैसे थे’ अवस्था झाली आहे. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला व मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जाणारा हा मार्ग नेहमीच दुरवस्थेत राहिला आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या जलद उपाययोजना कराव्यात, या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावे,अशी मागणी आदिवासी नेते रमेश पवार यांनी केली आहे.