रायगड जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

By Raigad Times    05-Sep-2021
Total Views |
raigad rain_1  
 
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात पुढचे तिन दिवस जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.
नागरिकांनी याप्रकारे आपली काळजी घ्यावी :
  • दिनांक 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू असल्याने दिनांक 8 सप्टेंबर पासून जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांनी काळजी घ्यावी.
  •  पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.
  • अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये. एकेरी वाहतूक सुरू राहील, याची दक्षता घ्यावी.
  • वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
  • अतिवृष्टीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.
  • आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी बसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे.
  • या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये.
  • घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  •  आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.
  • घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू,विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.
  • आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.
  • आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात.
  • मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत.
  •  अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा.
  •  रेडिओ साठी काही जास्त बॅटर्‍या जवळ ठेवाव्यात.
  •  अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणार्‍या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.
  •  विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये.
  •  ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.
  •  आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे. मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141- 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141- 222097 या क्रमांकावर संपर्क साधावा.