मुंबई-गोवा महामार्गासाठी 'समृध्द कोकण'ची मानवी साखळी

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील दिरंगाईकडे वेधले लक्ष

By Raigad Times    05-Sep-2021
Total Views |
Mumbai_Goa National Highw
 
पोलादपूर (शैलेश पालकर) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील या कोकण महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील दिरंगाईबाबत गेल्या काही दिवसांपासून समृध्द कोकण संघटनेतर्फे सुरु असलेले आंदोलनासाठीचे प्रयत्न रविवारी (5 सप्टेंबर) यशस्वी झाले. खड्डेमुक्त, दर्जेदार महामार्गासाठी पोलादपूर येथे नरवीर संस्थेच्या कार्यालयासमोर मानवी साखळी साकारण्यात आली.
 
कोकण हायवे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे आंदोलन होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पुढील दीड वर्षात खड्डेमुक्त आणि दर्जेदार महामार्ग पूर्ण व्हावा, इंदापूर ते माणगांव हा टप्पा सहा पदरी असावा, डोंगर पोखरण्याऐवजी नदीतील गाळ काढून भरावासाठी वापरावा, महामार्गाचे काम पूर्ण झाल्याखेरिज टोल आकारणी होऊ नये, सर्व्हीस रोड महामार्गाच्या दोन्ही बाजूला असावा, दर 25 किमी वर शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकरी बाजाराची सुविधा असावी, अशा अनेक मागण्यांसाठी हे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

Mumbai_Goa National Highw 
 
यावेळी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली. यावेळी समृध्द कोकण संघटनेचे नेते तसेच कोकण हायवे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी, गेल्या 12 वर्षांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अतिशय संथगतीने सुरू असून सध्याचे खड्डेमय स्वरूप पाहता ही पायवाट असल्याची टीका केली.

Mumbai_Goa National Highw
 
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी सभापती दिलीप भागवत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय सलागरे, मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, विविध उद्योग-व्यवसायांतील व्यक्तीमत्व रामदास कळंबे, संतोष मेढेकर, सामाजिक कार्यकर्ता दीपक उतेकर आणि कोकण हायवे समन्वय समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Mumbai_Goa National Highw
 
इंदापूर ते माणगांव हा टप्पा सहापदरी असावा, अशी मागणी या मानवी साखळी आंदोलनाद्वारे करण्यात आली असली तरी दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा दिघी पोर्ट ट्रस्टपर्यंत असून सध्याच्या महामार्गावरील इंदापूर आणि माणगांव या दोन्ही गावांचा चौपदरीकरणामध्ये समावेश नसल्याने या आंदोलनाचा राज्य व केंद्र सरकारला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

Mumbai_Goa National Highw