गणेशोत्सवासाठी रायगडमधून कोकणात जाणार 1 हजार 300 एसटी बसेस

गरज लागल्यास आणखीन 150 गाड्या सोडणार

By Raigad Times    05-Sep-2021
Total Views |
Ganpati Festival Konkan_S
 
  • राज्य परिवहन विभागाची जय्यत तयारी
  • ठिकठिकाणी दुरुस्ती पथके तैनात ठेवली जाणार
पेण (देवा पेरवी) । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी रायगड जिल्ह्यातून 1 हजार 300 बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. या गाड्यांव्यतिरिक्त पुढे गरज लागल्यास आणखीन 150 बसेस सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन विभागाने केले आहे. गणेशोत्सासाठी पाठविण्यात येणार्‍या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचे कामही सुरु आहे.
 
उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई, ठाणे, गुजरात, नवी मुंबईसारख्या महानगरातून गणेशभक्त कोकणात दाखल होत असतात. ही बाब लक्षात घेऊन रायगडच्या राज्य परिवहन विभागाने यंदा विशेष तयारी केली आहे. कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी रायगड जिल्ह्यातून 1 हजार 300 बसेस सोडल्या जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढे गरज पडल्यास आणखीन 150 ते 200 गाड्या सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन विभागाने सुरु केले आहे.
 
यातील 8 सप्टेंबरला सर्वाधिक साडेआठशे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. कर्नाळा, रामवाडी, सुकेळी खिंड, वाकण फाटा, लोणेरे आणि कशेडी घाटात एसटी महामंडळाची दुरुस्ती पथके तैनात ठेवली जाणार आहेत. याशिवाय रोहा आणि माणगावची फिरती दुरुस्ती पथके महामार्गावर उपलब्ध राहणार आहेत. दोन खासगी हॉटेलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष थांबेही देण्यात आले आहेत.
 
सणाला कोकणात जाणार्‍या चाकरमानी गणेशभक्तांच्या कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याच्या सुरक्षेसाठी रायगडच्या राज्य परिवहन विभागाने खबरदारीची पावले उचलली आहेत. एसटी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या दृष्टीने सर्व बसेस निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. यात महत्वाचे म्हणजे नव्या पद्धतीचा अवलंब करून सर्व बसेस अँटी बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतूक करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगड विभागाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
--------------------------------------------- 
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रायगड विभाग हा सज्ज झाला आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास हा सुखकारक व आनंददायी व्हावा, यासाठीही खबरदारी घेतली आहे. 1300 बसेसची बुकींग झाली आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 150 बसेसच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.
- अनघा बारटक्के, वाहतूक नियंत्रक, रामवाडी-रायगड एसटी महामंडळ