पनवेल : सिडको वसाहतींमध्ये पाण्याची बोंब!

04 Sep 2021 17:14:13
panvel cidco 2_1 &nb 
 
  • अपुर्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारींचा पाऊस; पाण्याअभावी रहिवाशांची गैरसोय
  • सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून आंदोलन, निवेदनांचा सपाटा
पनवेल | पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाण्यासंदर्भात तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. याविरोधात सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने आणि निवेदनाचा सपाटा लावून सिडकोला घेराव घातला. तसेच त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
 
पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पनवेलचा झपाट्याने विकास होत आहे. सिडको वसाहतींची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यात सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो घर बांधण्यात येत आहेत. त्यामुळे सहाजिकच लोकवस्ती आणि पाण्याच्या मागणीत भर पडत आहे. सिडकोने वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठ्याचा विचार केला नाही. स्वतःच्या मालकीचे जलस्त्रोत निर्माण करण्यात आले नाहीत. सिडकोचे स्वतः चे असे धरण नाही. हेटवणे धरणाचा विकास केला म्हणून १५० एमएलडी पाणी आरक्षित आहे. ते वगळता हक्काचे असे पाणी सिडकोकडे नाही. त्यामुळे वसाहतीतील रहिवाशांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, नवी मुंबई महानगरपालिका यांच्यावर अवलंबून राहावे लागते.
 
सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे या महत्त्वाच्या नोडला एम जेपीचे पाणी दिले जात आहे. मागणीप्रमाणे येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाताळगंगा नदीतील पाणी उचलून एमजेपी भोकरपाडा येथे जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करते. तेथून जलवाहिन्यांद्वारे पाणी जेएनपीटी, आजूबाजूचे गाव, पनवेल शहर, सिडको वसाहतींना पुरविण्यात येते. पाताळगंगा नदी बारामाही नाही. ती हंगामी असल्याने फक्त पावसाळ्यात पात्रात पाणी असते.
 
खोपोलीत टाटा पॉवरचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या ठिकाणी पाण्यावर विजनिर्मिती करण्यात येत असल्याने उरलेले पाणी हे पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे वर्षभर नदीत पाणी दिसून येते. एकंदरीतच विचार केला तर या पाण्यावरच पनवेलकरांची तहान भागवली जाते. टाटा पॉवर प्रकल्प या परिसरातील लोकांचा जलदाता मानला जातो. या प्रकल्पासाठी घाटावर स्वतंत्र धरण आहे. त्याचबरोबर वर्षभर वीजनिर्मितीचे काम केले जात असल्याने या आगोदर पाण्याची टंचाई निर्माण होत नव्हती.
 
परंतु कामगारांच्या सुट्टीमुळे रविवारी वीज निर्मिती प्रकल्प बंद ठेवला जातो. तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे केंद्र बंद असते. या काळात वीजनिर्मिती होत नसल्याने पाणी बाहेर सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पनवेल शहराबरोबरच कळंबोली आणि नवीन पनवेलकरांना मुबलक पाणी मिळत नाही. एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्यामुळे त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. दुरूस्ती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नवीन पनवेल आणि कळंबोलीतील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याविरोधात खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने मागील आठवड्यामध्ये सिडको भवनवर मोर्चा काढून तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
यासंदर्भात सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी संबंधित सामाजिक संस्थांबरोबर चर्चा केली, त्यामध्ये खारघर-कामोठे फोरम, सिटीजन युनिटी फोरम, खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचा समावेश होता. बुधवारी (१ सप्टेंबर) आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली. यामध्ये महापौर डॉ.कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्यासह नगरसेवकांचा समावेश होता. सिडको वसाहतीतील पाणीटंचाईबाबत यावेळी निवेदन देण्यात आले.
 
यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही कैलास शिंदे यांनी दिली. तत्पूर्वी खारघरमधील नगरसेवकांनी सिडको कार्यालयात जाऊन पाण्याच्या कमतरतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन या भागातील पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
 
२०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची गरज
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे, तळोजा आणि काळुंद्रे या भागात जवळपास २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. परंतु तितके पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना या भागांमध्ये पाणीबाणी सुरू झाली आहे. 
Powered By Sangraha 9.0