म्हसळा : म्हसळा शहरातील सर्प मित्रांनी शुक्रवारी (३ सप्टेंबर) आठ फुटी अजगराला जीवदान दिले. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षक भिंतीजवळ शासकीय निवासस्थानी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना हा अजगर निदर्शनास आला होता.
तिथे उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका चालक प्रदीप काळोखे यांनी पत्रकार सुशील यादव यांना फोन लावून त्वरित सर्पमित्रांस पाचारण करण्यास सांगितले. त्यानुसार यादव हे काही वेळातच उबेद कादीरी या सर्पमित्रास बरोबर घेऊन घटनास्थळी पोहोचले. उबेद याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असलेल्या ज्योती पवार यांचे पती अमित पवार यांच्या मदतीने या अजगरास मोठ्या शिताफीने पकडले.
यावेळी डॉ. सुरज तडवी, नांदगावकर, अनिकेत पांगारे, पत्रकार बाबू शिर्के, कल्पेश जैन, सलाम पंडे, अरुण कोल्हे आदी उपस्थित होते. सदर अजगरास लगेचच पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पत्रकार व घटनास्थळी हजर असलेल्या वैद्यकीय कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत घनदाट जंगलात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले.
दरम्यान, या सर्व घटनेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या उबेद व अमित यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.