‘तिबोटी खंड्या’ रायगडचा जिल्हा पक्षी घोषित!

By Raigad Times    30-Sep-2021
Total Views |
ticiti_1  H x W
 
अलिबाग | ‘खंड्या’ म्हणजेच ‘तिबोटी खंड्या’ हा पक्षी कोकणसाठी नवीन नाही, नदीच्या अवतीभवती घुटमळणारा हा अतिशय देखणा पक्षी आहे. विद्यार्थ्यांसाठी मराठीच्या पुस्तकात ‘खंड्या’ नावाची कवितादेखील होती. हाच देखणा ‘खंड्या’ आता आपल्या रायगडचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाविन्यपूर्ण योजनेतून साकारलेल्या ‘रायगड...वारसा इतिहासाचा..संस्कृतीचा अन् निसर्ग सौंदर्याचा’ या लघुचित्रफितीचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी पालकमंत्र्यांनी ‘तिबेटी खंड्या’ या पक्षाची रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषणा केली.
 
पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये या पक्ष्याचा अधिवास आहे. मनमोहक, सुंदर असा हा पक्षी तिबेटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher) सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. मे ते ऑक्टोबरपर्यंत या पक्ष्याचा रहिवास आढळून येतो. जंगलात ओढा, तलाव, मातीच्या कड्यात जिथे जमीन भुसभुसीत असेल तिथे एक मीटर घरटे करून हे पक्षी राहतात. हा पक्षी त्याचा आकार व चमकदार रंगामुळे वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. कपाळावर काळा डाग, मानेच्या बाजूला निळा आणि पांढरा रंग, पंख गडद निळ्या व काळ्यारंगाचे असतात.
 
मानेवरील भाग पिवळसर केशरी असतो. चोच पिवळसर नारंगी रंगाची असून शेपटी नारंगी गुलाबी असते. पक्षाच्या तळव्याला तीन बोटे असल्याने याला ‘तिबोटी खंड्या’ असे म्हणतात. रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित केल्याने या पक्षाचे जतन व संवर्धन करण्याकरिता मदत होणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.