पेण : गौरीच्या निर्मितीसाठी गणेशमूर्ती कारखान्यातील महिलांचा हातभार

03 Sep 2021 17:07:41
Gauri-Ganpati Festival Ko
 
पेण (देवा पेरवी) । गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यात गणेशमूर्तींबरोबरच गौरीच्या मूर्तींची निर्मितीदेखील मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे या गौरींच्या निर्मितीसाठी गणेशमूर्तिकारांच्या घरातील महिला मेहनत घेताना दिसत आहेत.
 
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांतील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणार्‍या पेणमधून यावर्षी जवळपास 25 ते 30 लाख गणेशमूर्ती देशभरासह विविध राज्य व परदेशात पाठविण्यात येतात.
 
डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पेणच्या गौरी गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातूनही मागणी वाढत आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
 
जोहे, हमरापूर, कळवे, दादर, तांबडशेत, अंतोरे, दिव, उंबर्डे आदी गावांत शेकडो कारखाने तयार झाले आहेत. तर जोहे-हमरापूर गणेशमूर्तीचे हब म्हणून ओळखले जाते. गणेशमूर्तींबरोबरच गौरीच्या मूर्तीदेखील त्याच कलाकुसरीने बनविल्या जातात. गणपतीबरोबर येणार्‍या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते.

Gauri-Ganpati Festival Ko
 
प्रत्येक कुटुंबात आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. गौराईच्या मूर्ती निर्मितीसाठी गणेशमूर्ती कारखान्यातील महिला पुढे सरसावल्या आहेत. ज्या कल्पकतेने, कलाकुसरतेने गणेशमूर्तिकार मूर्ती साकारतात, त्याच कल्पकतेने व कलाकुसरतेने या महिला कलाकार गौरींचे मुखवटे साकारतात.
 
पेण तालुक्यातील अंतोरे गावातील गावदेवी कला केंद्रातील अमृता लांगी या मागील अनेक वर्षांपासून आपल्या कारखान्यात गौरींचे मुखवटे साकारत आहेत. गणेशमूर्तींसारख्या गौरीच्या मूर्तींचीदेखील सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती व विविध प्रकारच्या गौरीचे मुखवटे साकारले जात आहेत. हे मुखवटे साकारण्यात कारखान्यातील इतर महिलांचाही मोठा सहभाग असतो.
 
या गौरी-गणपतीच्या मूर्तींमुळे तालुक्यातील असंख्य महिलांना रोजगार मिळाला आहे.
--------------------------------------------
मागील अनेक वर्षांपासून गणेशमूर्तींसह गौरीच्या मूर्तींना देखील मागणी वाढली आहे. सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती व विविध प्रकारच्या मूर्तींमुळे गुजरात, पुणे, मुंबई व विशेषतः कोकणात गौरींना जास्त मागणी आहे.
- अमृता अजित लांगी,
गावदेवी कला केंद्र, अंतोरे-पेण
--------------------------------------------
गौरी-गणपतीच्या मूर्तींमुळे आमच्या पेणमधील गावागावातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. आम्ही मुखवटे बनविणे, कपडा कलर, डोळ्यांची आणखी, सोनेरी शाई लावण्याबरोबर शेडिंग ही करतो.
- प्रिती सागर पाटील, पेंटर, जोहे, पेण
Powered By Sangraha 9.0