अलिबाग । अलिबागकर प्रतिक जुईकर यांनी रायगडकरांची मान उंचावली आहे. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत, मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. ते देशात 177 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. याचबरोबर ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवला आहे. या यशानंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारे आहेत. ते आयएएस झाल्याची बातमी पसरताच, अलिबागकरांमध्ये आनंदाची लहर पसरली. कर्जत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचे ते सुपूत्र आहेत. पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचे असलेले प्रतिक जुईकर यांना वाचनाची आवड होती. ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कर्जत तालुक्यातून पहिले आले होते.
पुढे त्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी.टेक झाले. त्यानंतर नोकरी करत असताना, तेथील मित्र हे आयआयटी करुन युपीएससीची तयारी करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, प्रतिक जुईकर यांनीही युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. प्रतिक यांच्या आई-वडिलांचीही ते आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती.
अथक परिश्रम करीत, प्रतिक जुईकर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून, ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मुलाखतीचा अडथळाही पार केला असून, देशात 177 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या जिल्ह्यातील अन्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
प्रतिक जुईकर यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशानंतर, अलिबागकरांसह जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका शेतकरी कुटुंबातील, शिक्षकाचा मुलगा आणि अलिबागकर आयएएस झाल्याचा आनंद व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश फिरत आहेत.
दरम्यान, शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, उपतालुकाप्रमुख प्रकाश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य जीवन पाटील, कुसुंबळे विभागप्रमुख मन्मय पाटील यांनी प्रतिक जुईकर यांच्या शहाबाज येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आयएएस अधिकारी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.