खोपोली नगरपरिषद हद्दीतील शिळफाटातील रस्ते, शौचालय, गटारांची दैनावस्था

By Raigad Times    22-Sep-2021
Total Views |
K 1_1  H x W: 0
 
वारंवार तक्रारी करुनही नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांकडून होतेय दुर्लक्ष
 
खोपोली | खोपोली नगर परिषद ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुरस्काराने सन्मानित असलेली नगर परिषद आहे. मात्र सद्यस्थितीत या नगर परिषदेतील शिळफाटा परिसरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. येथील रस्त्यांसह शौचालय, गटारांची दैनावस्था असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर असलेल्या शहाणे आळीमध्ये अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे.
 
K3_1  H x W: 0
 
गेल्या पाच वर्षांपासून या प्रभागात खराब रस्ते, तुटलेली गटारे, शौचालयाचे तुटके दरवाजे, पिण्याचे पाणी भरण्याची ठिकाणे नळाची व कठड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील आजपर्यंत या प्रभागात खोपोली नगर परिषदेचे कोणतेही अधिकारी तसेच या वॉर्डचे लोकप्रतिनिधी पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत.
 
K2_1  H x W: 0
 
या प्रभागात सफाई कामगार अद्यापही येत नसल्याचे शहाणे आळीचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. एकीकडे कोरोनासारख्या आजाराने अक्षरशः लोकांची कंबर मोडली आहे. तर दुसरीकडे नोकरी, व्यवसांयावर मोठे परिणाम झाले असल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खोपोली नगर परिषद ही ‘स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली’चा नारा लावणार्‍या शहरात विकास कामांवर लाखो रुपये लागतात तरी कुठे? विकासकामे केली जातात तरी कुठे? खोपोली नगर परिषदेने स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमलेले आहेत. मग या ठेकेदाराची कर्मचारी साफसफाई करतात तरी कुठे? असा सवाल खोपोली शहरातील शहाणे आळीचे स्थानिक नागरिक विचारत आहेत.
 
------------------------------------------------------------------------------------------
खोपोली नगरपरिषद स्वच्छतेवर व विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, पण ती कामे कुठे केली जातात? आम्ही शहाणे आळीचे रहिवासी असून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरून ही या प्रभागात सुधारणा का केली जात नाही? वारंवार तक्रारी करून ही अद्याप कोणीही पाहण्यासाठी गेल्या पाच वर्षात आले नाही. या प्रभागातील लक्ष देऊन आमची समस्या नगरपरिषदेने सोडावी, अशी मागणी शहाणे आळीतील नागरिक करत आहेत.