रायगड : चोर्‍यांचे सत्र सुरुच! नेरळ रेल्वे स्टेशनजवळील नऊ दुकाने फोडली

20 Sep 2021 19:18:32
Theft_Crime News_1 &
 
कर्जत । नेरळ रेल्वे स्थानकालगत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नऊ दुकानांमध्ये 19 सप्टेंबरच्या पहाटे चोरीच्या घटना घडल्या आहेत. सुट्ट्या पैशांची चिल्लर आणि खाद्य पदार्थ यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोर्‍यांमुळे नेरळ पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
 
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ रेल्वे स्टेशनलगत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या मार्गावर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मागील काही वर्षांत रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. बांधकाम करुन उभ्या राहिलेल्या त्या दुकानांमध्ये व्यवसाय करणार्‍या नऊ दुकानांना 19 सप्टेंबरच्या पहाटे चोरट्यांनी लक्ष्य केले.

Theft_Crime News_1 &
 
तेथील चिराग बेंगल स्टोअर, कोमल साडी सेंटर, बबलू टी स्टॉल आणि अन्य सहा अशी नऊ दुकाने फोडून चोरांनी डल्ला मारला. लोखंडी शटर लोखंडी हत्याराने वाकवून त्या दुकानांमध्ये चोर्‍या केल्या आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर या दुकानदारांनी सकाळी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
 
चोरट्यांनी दुकानांमधून रोख रक्कम तसेच सुट्या पैशांची चिल्लर आणि खाद्य पदार्थ यांच्यावर ताव मारला आहे. पोलिसांनी त्याबाबत तपास सुरू केला असून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेरळ रेल्वे स्थानक येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधील फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Theft_Crime News_2 &
 
चोर्‍या झालेली दुकाने ही नेरळ रेल्वे स्टेशनलगत आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र यादरम्यान असल्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरे हे चोरांना पकडण्यासाठी नेरळ पोलिसांच्या मदतीला येतील, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0