सुधागडात मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी समाजबांधव आले एकत्र

20 Sep 2021 16:13:49
pali_1  H x W:
 
शिक्षण, आरोग्य, स्थलांतर, रोजगाराच्या प्रश्‍नांकडे वेधले लक्ष
 
पाली/बेणसे | सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथील डोंगर दर्‍या खोर्‍यात रानावनात जंगल माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर आदिवासी कातकरी समाज वास्तव्यास आहे. सुधागडात वावे तर्फे आसरेत आदिवासी बांधवांचे मूलभूत व ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण सभा पार पडली.
 
यावेळी शिक्षण, आरोग्य, स्थलांतर, रोजगार, निवारा, शेती आदी विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करत, या महत्वाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच यावर आवश्यक उपाय करण्यासंदर्भात विचारविनीमय करण्यात आला. या सभेला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आदिवासी समाजबांधवांची एकजूट दिसून आली. यावेळी आदिवासी नेते रमेश पवार यांनी सुधागडसह जिल्ह्यातील अनेक भागातील आदिवासी समाज आजही मूलभूत नागरी सेवा, सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
 
आदिवासी कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या जमिनी मोठे भांडवलदार, विकासक कवडीमोल भावाने दमदाटी करून खरेदी करतात, हे फसवणुकीचे व अन्यायकारक प्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची भूमिका पवार यांनी मांडली. तसेच समाजाची प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. लोकशिक्षणाची चळवळ गतिमान करून व्यसनमुक्तीसाठी येत्या काळात प्रभावीपणे काम करणार असल्याची भूमिका रमेश पवार यांनी मांडली.
 
pali 1_1  H x W
 
दगडू वाघमारे म्हणाले की, आदिवासी समाज शैक्षणिक प्रगती साधत असून गावात एकोपा नांदावा, यासाठी सर्व गाव मिळून एकत्रित सण व उत्सव साजरे केले जातात. यामध्ये पारंपरिक उत्सव साजरे करताना संस्कृती जोपासली जाते. कोरोना महामारीत अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असताना शासनाने अन्नधान्य पुरविण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेतली. त्यामुळे या संकटाचा धीराने सामना करता आला, असे दगडू वाघमारे म्हणाले.
 
विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, आदिवासी निसर्गपूजक आहेत. आदिवासींची हस्तकला, आदिवासी नृत्य, आदिवासी देवदेवता व परंपरा, लग्नकार्य, अलंकार हा ठेवा अनमोल असा आहे. आपली संस्कृती महान असून या पारंपरिक संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे, असे वाघमारे म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी लस आदिवासीबांधवांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावी, अशी जनजागृतीही या बैठकीत करण्यात आली.
 
यावेळी आदिवासी समाज नेते रमेश पवार, विष्णू वाघमारे, दगडू वाघमारे यांच्यासह गणपत वाघमारे, एकनाथ पवार, अशोक आंग्रे, बारकु वाघमारे, किसन वाघमारे, धोंडू बोडेकर, दशरथ वाळेकर, सुरेश पवार, मारुती वाघमारे, भगवान वाघमारे, बाळू वाघमारे, आदी पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0