सुधागड : ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात!

By Raigad Times    20-Sep-2021
Total Views |
guthka 1_1  H x
 
सुधागड-पाली  | राज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. शासनाकडून काही नियमदेखील घालून दिले आहेत. यात पानटपरीवर पान मसाला, गुटखा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तर नागरिकांनादेखील सार्वजनिक ठिकाणी थुकंण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सुधागड तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.
 
सुधागड तालुक्यातील पाली, परळी, पेडली, जांभूळपाडा, लगतच्या सर्वच परिसरामध्ये गुटखा खुलेआमपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे गुटखा खाणारे खुलेआमपणे कोठे पिचकारी मारत असतात. त्यामुळे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रणच म्हणावे लागेल. मात्र प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
 
सुधागड तालुक्यात ग्रामीण भागामध्ये किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. या खुलेआम गुटखा विक्री धंद्यावर प्रशासनाची वचक नसल्याचे दिसते. अन्न प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याची देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गुटखा बंदी केवळ नावापुरतेच उरली आहे.
 
सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना गुटखा उपलब्ध होतो तरी कसा? असा सवालही उपस्थित होत आहे. याकडे अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी लक्ष देऊन ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.