रायगडात 25 सप्टेंबरला भरणार राष्ट्रीय लोक अदालत

By Raigad Times    20-Sep-2021
Total Views |
alibag cort_1  
 
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
 
अलिबाग । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.
 
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय. अ‍ॅक्ट, खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
 
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास संपूर्ण कोर्ट फी परत मिळते तसेच प्रलंबित व वादपूर्व प्रकरणातील निकालाविरुध्द अपिल होत नाही. त्यामुळे पक्षकारांचा बराच वेळ व खर्च वाचतो, पक्षकारांना जलद व तात्काळ न्याय मिळतो.
 
त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष विभा प्र. इंगळे यांनी केले आहे.