कर्जत : बोरगाव येथे शेतकरी तरुणाची गळा आवळून हत्या

19 Sep 2021 18:01:16
Murder_Karjat_1 &nbs
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगावात एका 38 वर्षीय शेतकरी तरुणाची हत्या झाली आहे. शनिवारी (18 सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली. बोरगावमध्ये 1991 नंतरचा हा पहिलाच खून असून त्या आधी सातत्याने या गावात खूनाच्या घटना घडत होत्या.
 
जगदीश अंकुश पाटील हा 38 वर्षीय तरुण होमगार्डची नोकरी सोडून गेली सहा वर्षे म्हशी आणि गायी यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करीत होता. होमगार्डची नोकरी सोडल्यानंतर जगदीश व्यसनाच्या आहारी गेला होता. मात्र त्यांच्या कुटुंबाने खालापूर तालुक्यातील चौक येथे नशामुक्ती केंद्रात उपचार केल्यावर व्यसनापासून दूर गेलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाची गुरे आणि गायी-म्हशी यांचे पालन करण्यास सुरुवात केली.

Murder_Karjat_4 &nbs
 
गायी म्हशी यांचा बेडा बोरगाव येथून पोश्री नदीच्या पलीकडे ओलमण रस्त्यावर असून दररोज सकाळी सहा वाजण्यापूर्वी जगदीश हा तेथे गायी-म्हशींचे दूध काढण्यासाठी पोहचत असे. गावापासून लांब असल्याने फार कोणाची वहिवाट त्या भागात नाही. शनिवारी जगदीश पाटील पहाटे साडेपाच वाजता घरातून बेड्यावर जाण्यासाठी निघाला होता.
 
त्यानंतर शेताकडे गेलेले जगदीशचे काका सुरेश सीताराम पाटील यांना साडेसहा वाजण्याच्या सुमारास जगदीश बेड्याबाहेर उपडा पडलेला दिसला. त्यामुळे याबाबतची माहिती सांगण्यासाठी सुरेश पाटील धावतच गावात आले. साधारण पावणेसात वाजता अंकुश पाटील यांच्या घरी ही माहिती मिळताच घरातील सर्व मंडळी बेड्यावर पोहचली.

Murder_Karjat_3 &nbs
 
त्यावेळी जगदीश पाटीलच्या तोंडातून रक्त तसेच फेस आलेला होता. त्याचवेळी त्यांच्या गळ्याला काहीतरी फास आवळल्याच्या खूणा दिसत होत्या. तसेच शरीरावर काही जखमादेखील होत्या. त्यामुळे अंकुश पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जगदीशला उचलून इको गाडीमधून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी नेले. तेथे तपासणीअंती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी साडेसातच्या वाजण्याच्या दरम्यान जगदीशचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले.
 
याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत जगदीश पाटील याचा लहान भाऊ चिनू अंकुश पाटील याने फिर्याद दिली असून सकाळी साडेपाच ते साडेसहा यादरम्यान गळा आवळून जगदीशचा खून झाला असल्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बोरगावमध्ये तरुणाचा खून झाल्याची खबर मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते.

Murder_Karjat_2 &nbs
 
कळंब आउटपोस्टचे उपनिरीक्षक केतन सांगळे आणि पोलीस कर्मचारी हे मृतदेह आणण्यात आलेल्या ठिकाणी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्तात तैनात होते. बोरगावमध्येदेखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी पाहणी करून मयताचे नातेवाईक आणि गावातील अन्य लोकांसोबत चर्चा केली असून खुनीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
 

Murder_Karjat_1 &nbs 
Powered By Sangraha 9.0