माणगावात घरफोडी! सोन्याच्या दागिन्यांसह साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

By Raigad Times    19-Sep-2021
Total Views |
Crime_House Breaking_Mang
 
माणगाव । माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धीनगर खांदाड भागात घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह 9 लाख 48 हजारंचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.
 
ही घटना शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी साडेनऊ ते रात्री सव्वाआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची फिर्याद प्रतिभा प्रभाकर पोळेकर (वय 45, रा.सिद्धीनगर खांदाड माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. प्रतिभा पोळेकर या त्यांच्या पतीचे डोळ्याचे ऑपेरेशन करण्याकरिता पती व मुलीसह पनवेल येथे गेल्या होत्या.
 
याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व सोन्याचा शाही हार, ब्रेसलेट, लहान हार, दोन बांगड्या, चार कानातील डोल, सोन्याच पान, गंथन, अंगठी, सोन्याचे पाच कॉईन, चेन यासह दीड लाखाची रोकड असा एकूण 9 लाख 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
 
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम.वराळे हे करीत आहेत.