पोलादपूर : खैराची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडला

वन विभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई

By Raigad Times    19-Sep-2021
Total Views |
forest action against ill
 
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील कापडे गावातील महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर खैराच्या सोलीव लाकडांची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. महाड ढालकाठी येथील पुणे येथून महाबळेश्वर मार्गे पोलादपूर ते पुढे रत्नागिरी खेडकडे हा टेम्पो निघाला होता. याचदरम्यान वन विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई करत, सोलीव खैराच्या लाकडाने भरलेला टेम्पो जप्त केला.
 
पोलादपूर तालुक्यात महाबळेश्वरमार्गे कापडेपर्यंत एका टेम्पोमधून सोलीव खैर लाकडाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वन विभागाच्या फिरत्या पथकाने पाळत ठेऊन शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात टेम्पो आणि 2.916 घनमीटर आकारमानाचे 3 लाख 47 हजार 47 रुपये किंमतीचे 231 खैर सोलीव नग जप्त करण्यात आले.
 
याप्रकरणी महाड-ढालकाठी येथील टेम्पो चालकमालक गजानन यशवंत दिघे व निलेश गंगाराम साळवी (रा. रेपोली, ता.माणगांव) तसेच दीपक महाडिक (रा.दापोली, जि.रत्नागिरी) यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक रोहा आणि सहाय्यक वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही कारवाई करण्यात आली.
 
शुक्रवारी सायंकाळी संशयित टेम्पो कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर थांबवून तपासला असता त्यामध्ये खैर सोलीव लाकडे विनापरवाना आढळून आली. संबंधित वाहनावर वन विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल महाड यांच्या कार्यालयासमोर वाहन मुद्देमालासह जप्त करून आणले.
 
ही कारवाई उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक रोहाचे इच्छात कांबळी, वनक्षेत्रपाल महाड राकेश साहू, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक पोपट कारंडे, वनपाल पोलादपूर श्याम गुजर, वनरक्षक तपासणी नाका नवनाथ मेटकरी, सचिन मेने व वनरक्षक मच्छिंद्र देवरे, दिलीप जंगम या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
 
पोलादपूर तालुक्यातील खैरतोडीसाठी केले जाणारे प्रयत्न या आणि यापूर्वीच्या कारवाईनंतरही अद्याप थांबले नसून अनेक जंगलातील खैरतोडीनंतर रातोरात वाहतूक केली जात असल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकार्‍यांनी जागृत नागरिकांना या अवैध वाहतुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.