माणगाव बस डेपोतील खड्ड्यांकडे परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; रास्ता रोकोचा इशारा

By Raigad Times    18-Sep-2021
Total Views |
mangav_1  H x W
 
माणगाव | माणगाव बसस्थानकासमोर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून ही समस्या गेल्या अनेक वषार्र्ंपासून आहे. परिवहन महामंडळाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. ही समस्या लवकरात लवकर परिवहन महामंडळाने न सोडविल्यास तालुका भाजपतर्फे बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा माणगाव तालुकाध्यक्ष संजय ढवळे यांनी दिला आहे.
 
माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती असे दक्षिण रायगडातील महत्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे एसटी बस आगार व्हावे, याकरिता १ मे २००० साली माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर माणगाव एसटी आगाराचे काम मार्गी लागले. माणगाव येथे एसटी आगार झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. येथील विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा माणगावकरांची होती. मात्र समस्यांनी माणगाव बसस्थानक ग्रासले आहे.
 
आज बसस्थानकातील अनेक समस्यांबाबत परिवहन महामंडळाने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. त्या समस्यांपैकी एक असणारे बस स्थानकासमोरील खड्डे हा प्रश्न गेली अनेकवर्षे सर्वानाच सतावतो आहे. परिवहन महामंडळाने पडलेल्या या खड्ड्यांवर तीन वर्षापूर्वी तात्पुरती मलमपट्टी केली होती; पण कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत नाही. या बस स्थानकात मुंबई तसेच कोकणातून, पश्चिम महाराष्ट्रातून बसेस येत असतात. त्यांना माणगाव स्थानकात प्रवेश करताना या खड्ड्यांना तोंड द्यावे लागत आहे. या खड्ड्यांच्या समस्येबाबत आता माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
तालुका भाजपचे अध्यक्ष संजय ढवळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी माणगाव बस स्थानकाची पाहणी करणे गरजेचे आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवासी, नागरिक यांना त्याचा त्रास होत आहे.
 
केवळ डागडुजी करून माणगावकरांची समज काढू नका तर चांगल्या दर्जाचा हा बसस्थानकाचा संपूर्ण परिसर करून खड्डेमुक्त बसस्थानक करा अन्यथा; १ नोव्हेंबर रोजी बसेस अडवून तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन याची सर्वस्वी जबाबदारी परिवहन महामंडळाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.