गव्हाण फाटा-दिघोडे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

By Raigad Times    18-Sep-2021
Total Views |
jnpt_1  H x W:
 
जेएनपीटी | चिर्ले, वेश्वी आणि दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील कंटेनर यार्डच्या मालकानी गव्हाण फाटा-दिघोडे या प्रवासी नागरीकांच्या रहदारीच्या रस्तावर बिनधास्त अवजड वाहने उभी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या प्रवासी वाहनांना अशा बेशिस्त अवजड वाहनांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
 
नवीमुंबई आणि पेण, अलिबाग तालुक्याला जोडणारा गव्हाण फाटा - दिघोडे - चिरनेर हा उरण तालुक्यातील महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहणांची तसेच मालवाहू अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने गव्हाण फाटा- चिरनेर-खारपाडा या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले. परंतु चिर्ले, वेश्वी आणि दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहिलेल्या कंटेनर यार्डच्या मालकानी शासकीय नियमांची पायमल्ली करून रस्त्याजवळच संरक्षण भिंत उभ्या करून सदर रस्त्यावर अवजड वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. अशा बेशिस्तपणे उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे रात्री अपरात्री सदर रस्तावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
 
वारंवार उद्भवणार्‍या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणार्‍या मोटारसायकल स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तसेच रुग्णवाहिका सेवेला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तरी नवीमुंबई पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण तहसील कार्यालय यांनी अशा बेशिस्त अवजड वाहनांवर तसेच कंटेनर यार्डच्या मालकावर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी प्रवाशी नागरीक, रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.