श्रीवर्धन : पुनीरमध्ये विजेच्या धक्क्याने ६ म्हशी दगावल्या

18 Sep 2021 12:39:31
cow death_1  H
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील पुनिर गावाचे हद्दीमध्ये एका शेतकर्‍याच्या सहा म्हशींचा मृत्यू महावितरणचा शॉक लागून झाला आहे. सहा म्हशीं पैकी चार म्हशी दूभत्या होत्या. पुनीर गावातील शेतकरी लियाकत इस्माईल पठाण यांच्या मालकीच्या या म्हशी होत्या. म्हशी चरून गुरांच्या गोठ्याकडे येत असताना महावितरणची विजेची तार जमिनीवर पडलेली असल्यामुळे म्हशींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
सदर घटना १२ सप्टेंबर रोजी घडली आहे. अकबर परदेशी यांच्या जागेत ही घटना घडली आहे. म्हशींसोबत असलेला गुराखी त्याच्या पायालादेखील मुंग्या आल्यासारखे जाणवल्यामुळे मागे पळून गेल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. अन्यथा त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा धोका होता. सदर मृत पावलेल्या म्हशींची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे सहा लाख सत्तर हजार रुपये होती.
 
म्हशींचा मृत्यू झाल्यामुळे लियाकत पठाण यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लियाकत पठाण यांनी याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. त्याचप्रमाणे तलाठी सजा चिखलप यांनीदेखील त्याठिकाणी जाऊन पंचनामा केलेला आहे. महावितरणच्या गलथान करभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सदर शेतकर्‍याच्या म्हशी मृत झाल्यामुळे त्याचा रोजगार धंदा पूर्णपणे बंद झालेला आहे. तरी महावितरणने व शासनाकडून सदर शेतकर्‍याला तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0