एसटी कर्मचार्‍यांची परवड सुरुच ना वेळेवर पगार; ना वैद्यकीय सोयी-सुविधा

पगाराविनाच कर्मचार्‍यांना करावे लागताहेत सणवार...

By Raigad Times    18-Sep-2021
Total Views |
st_1  H x W: 0
 
पेण | गेली दोन वर्षे कोरोना संकटाने संपूर्ण जगावर राज्य केले आहे. याच कोरोना काळात एसटीची आर्थिक संकटात रुतलेली चाके आता काही प्रमाणात बाहेर येऊन पूर्ववत होत आलेली असताना कर्मचार्‍यांना मात्र पगाराअभावी तसेच वैद्यकीय बिलांच्या अभावी जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एसटी कर्मचार्‍यांना वेतनाअभावी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
 
कोरोना काळातील निर्बंधाचा फटका देशातील तसेच राज्यातील उद्योग धंद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याच प्रमाणे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाला देखील कोरोनातील निर्बंधाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रवासी वाहतूक व माल वाहतूक हेच उत्पन्नाचे प्रमुख मार्ग बंद असल्याने एसटीचा आधीच खोलात असलेला गाडा आणखी खोलात गेला असून त्यातच तीन पक्षांचा सरकार असलेल्या राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेत विलंब होत असल्याचा मोठा परिणाम र्मचार्‍यांच्या पगारावरदेखील झाला आहे.
 
एकीकडे पगार वेळवर होत नसताना कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली असल्याने कर्मचार्‍यांचा मनस्ताप आणखी वाढला. त्यातच सध्या सुरू असलेले विविध सण कसे साजरे करावे? हाही प्रश्न एसटी कर्मचार्‍यांपुढे आहे. यापूर्वीही कोरोना काळात एसटी व्यवस्थासंपूर्ण बंद असल्याने वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. आता मात्र एसटीची गाडी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली असली तरी पुन्हा कर्मचार्‍यांचे पगाराअभावी वांदे झाले आहेत.
 
रायगड विभागातील पेण, महाड, श्रीवर्धन, माणगांव, अलिबाग, मुरुड, कर्जत, रोहा या आठ आगारात दोन हजार २७१ कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये ५०३ वाहक, ४९३ चालक असून १९ हे वर्ग दोनचे अधिकारी व ८०६ प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचार्‍यांचेही वेळेत वेतन मिळेल का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
 
-------------------------------------------------------------------------------- 
पगार दोन महिन्यांतून एकदा
कोरोना काळात असलेल्या निर्बंधा मुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळातदेखील कर्मचार्‍यांना पगार बंदच होता. निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रवासी व मालवाहतूक कार्गो सेवा सुरु झाली. सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाददेखील अल्प प्रमाणात होता. एसटीचा मुख्य प्रवासी असलेल्या खेडेगावातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. यामुळे निर्बंध शिथील झाले असले तरी हवे तसे उत्पन्न वाढले नसल्याचा परिणाम कामगारांच्या पगारावर होत आहे. दर महिन्याच्या सात तारखेला होणारा पगार दोन महिन्यांतून एकदा होऊ लागला आहे.
 
----------------------------------------------------------------------------------------------
वैद्यकीय बिले आठ महिने मिळेना
एकीकडे कामगारांचे पगार वेळेवर होत नसताना कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मेडिकल सुविधांची बिलेदेखील वेळेत मिळत नसल्याने कामगार मेटाकुटीला आले आहेत. कोरोना काळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही, त्यात स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण याच्याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे.
 
---------------------------------------------------------------------------------------
महामंडळाकडे असलेल्या निधीच्या उपलब्धतेप्रमाणे कर्मचार्‍यांचे पगार व वैद्यकीय बिले दिली जात आहेत. - अनघा बारटक्के, -विभाग नियंत्रक, रायगड