रोह्याला मिळाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षक

अडीच वर्षे जागा रिक्त असल्याने नागरिकांची झाली परवड

By Raigad Times    16-Sep-2021
Total Views |
Roha_1  H x W:
 
सिटीझन फोरमच्या यशस्वी पाठपुरावा
 
रोहा (मिलिंद अष्टीवकर) । रोहा तालुक्यासाठी असलेले उपअधीक्षक भूमिअभिलेख हे पद गेली अडीच वर्षे रिक्त होते. परिणामी, या कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांनी हा विषय खा. सुनील तटकरेंकडे मांडला व त्यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा केला. त्याला यश येत रोह्याला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
रोह्याला तब्बल अडीच वर्षे उपअधीक्षक भूमीअभिलेख पूर्णवेळ नसल्याने जमीन मोजणी इत्यादी जमिनी संबंधित विषयात नागरिकांची मोठी परवड होत होती. तेथे बड्या मंडळींची सर्व कामे सुलभतेने होत असताना सर्वसामान्यांची आणि विशेषकरुन शेतकरीवर्गाला त्रास दिला जात होता.
 
दरम्यानच्या काळात सिटी सर्व्हे कार्यालयात दलालांचा राबता वाढला, जमीन मोजणीचे तसेच इत्यादी विषयांत प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी वाढीस लागली. प्रत्येक कामाचे दर ठरले गेले, जी कामे प्रत्यक्ष कार्यालयात वारंवार जाऊन होत नव्हती, ती कामे दलालाच्या माध्यमातून काही मिनिटांच्या अवधीत होऊ लागली.
 
नागरिकांची होणारी पिळवणूक तसेच कार्यालयाला प्रमुख अधिकारीच पूर्ण वेळ नसल्याने या सर्व चुकीच्या गोष्टी सिटी सर्व्हे कार्यालयात घडत असल्याचे लक्षात आल्याने रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी सदर बाब खा. सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणली.
 
खा. तटकरे यांनी हा विषय गंभीरपणे घेत संबंधितांना तातडीने निर्देश दिले होते. त्यानंतर रोह्याला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षक म्हणून नंदकुमार माळवे यांची नुकतीच करण्यात आली आहे. रोह्यासाठी टीएलआर यांची तातडीने पूर्णवेळ नियुक्ती केल्याबद्दल रोहा तालुका सिटीझन फोरमचे प्रदीप देशमुख यांनी खा. सुनील तटकरे यांचे आभार मानले. आज (16 सप्टेंबर) देशमुख यांच्यासह फोरमच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त टीएलआर माळवे यांची भेट घेऊन त्याचे स्वागत केले.
 
यावेळी रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, प्रशांत देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशीकांत मोरे, राजेंद्र जाधव, रविंद्र कान्हेकर, रविना मालुसरे, वरसे उपसरपंच मनोहर सुर्वे, मिलिंद अष्टीवकर आदी उपस्थित होते.
 
यावेळी नागरिकांना भेडसावणार्‍या सर्व विषयांवर माळवे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी कार्यालयात मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात यावे, अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.
---------------------------------
जमीन मोजणी, इत्यादी संबंधित कामासाठी नागरिकांनि सरळ कार्यालयामध्ये संपर्क करावे, दलालाकडे जाऊ नये. नागरिकांची कुठे अडवणूक होत असल्यास तसेच कोणी पैशांची मागणी करीत असल्यास टीएलआर तसेच आमच्याकडे संपर्क करावा.
- प्रदीप देशमुख, निमंत्रक, सिटीझन फोरम
---------------------------------
टीएलआर ऑफिसचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न राहील, नागरिकांना त्यांच्या कामामध्ये काहीही त्रास अथवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी माझ्याकडे अवश्य संपर्क करावा.
- नंदकुमार माळवे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख-रोहा
---------------------------------