कोकणासाठी ३ हजार २०० कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

शिवसेना महाआघाडी सरकारचा निर्णय

By Raigad Times    16-Sep-2021
Total Views |
sir_1  H x W: 0
 
मुंबई | कोकणासाठी ३ हजार २०० कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ३ हजार २०० कोटी पैकी २ हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित १२०० कोटी रुपये पुढील ४ वर्षात (सन २०२२-२५) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
 
या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी ४ वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या ७ टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या ३ टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणार्‍या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.