रत्नागिरीच्या वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी ५ एकर जागा देण्याचा निर्णय

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

By Raigad Times    16-Sep-2021
Total Views |
ashok chavan_1  
 
मुंबई | रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५ एकर जागा महसूल आणि वनविभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
 
राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागासह आरोग्य, महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या रुग्णालयासाठी गट नं. ८६६ मधील ५ एकर जागा आरोग्य विभागास हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही जागा महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे.
 
या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे. उपचाराच्या आधुनिक सेवासुविधा उपलब्ध असलेले हे रूग्णालय रत्नागिरी जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणार आहे. शिवाय हे रूग्णालय मुंबई-गोवासारख्या व्यग्र राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने अपघातग्रस्तांनाही वेळीच उपचार उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकेल.