पेण : उत्साही वातावरणात गौरी-गणपतीचे विसर्जन

By Raigad Times    15-Sep-2021
Total Views |
pen_1  H x W: 0
 
पेण | मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील धार्मिक सणांना कोरोनाचे नियम लागू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र हा गणेशोत्सव साध्या पध्दतीने जरी साजरा करण्यात आला असला तरी घरामध्ये आलेल्या गौराईचे आणि पाच दिवसांच्या बाप्पाचे आज आनंदी वातावरणात आणि बाप्पाच्या जयघोषाने विसर्जन करण्यात आले.
 
पेण तालुक्यात 6026 खाजगी आणि 7 सार्वजनिक तर 1663 गौराईचे आज विसर्जन करण्यात आले. मात्र दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणुकीच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देण्याच्या प्रथेमध्ये गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खंड पडला असला तरी गणेश भक्तांनी अगदी आनंदी वातावरणात आणि टाळ वाजवत, बाप्पाच्या जयघोषात पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिला.
 
दरम्यान पेण पोलीस स्टेशन, दादर सागरी पोलीस स्टेशन, वडखळ पोलीसांनी सर्व विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील दादर, जोहे, कळवे, गडब, कासु, वाशी, जिते, हमरापूर, बळवली, अंतोरे, वडखळ आदी सर्व गावात पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे शांततेत विसर्जन करण्यात आले. पेण पालिकेने देखील भुंडा पूल, विश्वेश्वर मंदिर, फणस डोंगरी, शिवाजी नगर, चिंचपाडा, साई मंदिर या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते. आणि पावसाचे वाढते प्रमाण पाहता नदीच्या विसर्जन ठिकाणी 25 स्वीमर तैनात ठेवले होते.