जेएनपीटी । तलावाच्या काठावर लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घार पक्षाला प्राणी पक्षीमित्र आनंद मढवी यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने व वन अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जीवनदान दिले. आनंद मढवी यांच्यामुळे दुर्मिळ ब्राह्मणी घार पक्ष्याचा जीव वाचल्याने वन अधिकारी शशांक कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वेश्वी गावातील रहिवाशी लक्ष्मण मुंबईकर यांनी तलावासभोवती मत्स्य संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात दुर्मिळ ब्राम्हणी घार पक्षी अडकला होता. लक्ष्मण मुंबईकर यांनी सदर पक्षाचे प्राण वाचविण्यासाठी वन्यजीव निसर्ग संरक्षण (चिरनेर) संस्थेचे प्राणी पक्षीमित्र आनंद मढवी, शुभम मढवी, मनीष मढवी, मयूर मढवी, पीयूष लोंगळे, विनीत मढवी, पंकज घरत, दिलीप मढवी, बंटी शेळके, सुमित मढवी, नितीन मढवी, महेश भोईर, अभिमन्यू पाटील, रुपेश भोईर, बाळा कोळी, सुनील नाईक यांच्याशी सपंर्क साधून त्यांना बोलावून घेतले.
त्यांनी मोठ्या शिताफीने या पक्ष्याला सुरीच्या सहाय्याने जाळे कापून, सुखरूप बाहेर काढले. लगेचच याची माहिती वन विभागाला दिली व वनक्षेत्रपाल शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. इंगोले, हरिदास करांडे, आर. एस. पवार, आशा वाळे, डी.डी. पाटील यांच्या उपस्थितीत या पक्ष्याला दुधेला जंगल परिसरात सोडून दिले.
दरम्यान, कोणाच्या परिसरात, घरात अथवा संकटात निसर्गामधील कोणताही प्राणी, पक्षी अडकून पडला तर पक्षीमित्र आनंद मढवी यांच्याशी 9920494553 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आनंद मढवी यांनी केले आहे.