बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! रायगडात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन साधेपणाने

By Raigad Times    14-Sep-2021
Total Views |
Gauri_Ganpati Visarjan_Ra 
अलिबाग । 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर जिल्ह्यात गौरी आणि गणपतीला आज (14 सप्टेंबर) गणेशभक्तांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. समुद्र, नदी तसेच कृत्रिम तलावात तर काहींनी घरच्या घरीच विसर्जन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Gauri_Ganpati Visarjan_Ra
 
गणरायाचे आगमन झाल्यानंतर 5 दिवस गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चना केली. गणरायाला 5 दिवस मोदक, सुग्रास जेवणाचा नैवेद्य देण्यात आला. गौरीचे आवाहन झाल्यानंतर गौरी पूजन करुन महिलावर्गाने गौरीसमोर फुगड्या, गाणी, फेर धरला.

Gauri_Ganpati Visarjan_Ra 

Gauri_Ganpati Visarjan_Ra
 
जिल्ह्यात आज गणेशभक्तांकडून 75 सार्वजनिक, 56 हजार 460 घरगुती गणपतींचे तर 14 हजार 429 गौरींचे विसर्जन करण्यात आले. अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरुड, श्रीवर्धन आणि रेवदंडा येथील समुद्र किनार्‍यावर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

Gauri_Ganpati Visarjan_Ra
 
तर इतर ठिकाणी नदी आणि तलावांमध्ये गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. काहींनी कृत्रिम तलावामध्ये तर काहींनी घरच्या घरी आपल्या बाप्पाला निरोप दिला.

Gauri_Ganpati Visarjan_Ra
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणानेच बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा म्हणत बाप्पाला कोरोनाचे संकट दूर कर, अशी प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.