जेएनपीटी । जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड ज्योती म्हात्रे रविवारी (12 सप्टेंबर) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 68 वर्षांच्या होत्या.
ज्योती म्हात्रे यांनी दोन वेळा उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले. रायगड जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या त्या सदस्या होत्या. त्यांचे पती जगन्नाथ म्हात्रे हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते व उरणमधील प्रसिद्ध ग्राउंडवेल नॉर्टनमधील सीआयटीयू कामगार संघटनेचे नेते होते. त्यांच्या निधनाने खचून न जाता ज्योती म्हात्रे यांनी जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून आपले कार्य सुरु ठेवले.
उरणमधील पीडित महिलांना न्याय देण्यासाठी तसेच गोरगरीब व आदिवासी समाजाच्या समस्या घेऊन संघर्ष केला. महिला संघटनेच्यावतीने गेली अनेक वर्षे बोकडविरा येथील कामगार भवनात कौटुंबिक वादविवाद मिटविण्यासाठी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना बसवून त्यांचे संसार पुन्हा उभे करण्याचे काम त्या करीत होत्या. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या समाजकार्यात सक्रीय होत्या.
ज्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला, त्यावेळी त्या मुंबईतील साकीनाका येथील महिलेवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आयोजित निदर्शनात जाण्यासाठी निघाल्या होत्या.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव प्राची हतिवलीकर, उपाध्यक्ष हेमलता पाटील, मुंबईच्या सुगंधी फ्रान्सिस, रायगड जिल्हा सचिव अमिता ठाकूर, तारा ठाकूर, कुसूम ठाकूर, निरा पाटील या महिला नेत्यांनी तसेच जेएनपीटीचे कामगार कॉम्रेड भूषण पाटील, किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, डी.वाय.एफ.आय.चे राज्य उपाध्यक्ष संतोष ठाकूर त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्योती म्हात्रे यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.