श्रीवर्धन : बोर्लीपंचतनच्या सरपंच नम्रता गाणेकर यांचा राजीनामा

पुढील सरपंच कोण? याची उत्सुकता

By Raigad Times    13-Sep-2021
Total Views |
बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपं
बोर्लीपंचतन (अभय पाटील) । श्रीवर्धन तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच नम्रता निवास गाणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षांसाठी आता राष्ट्रवादीच्या महिला सदस्यातून कोण सरपंच होणार? याची उत्सुकता ग्रामस्थांना आहे.
 
श्रीवर्धन तालुक्यातून महत्वाची व तालुक्यातील मोठ्या बाजरपेठेची असलेली ग्रामपंचायत म्हणून बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. सध्या ग्रामपंचायत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आय या मित्रपक्ष अर्थात आताच्या महाविकास आघाडीकडे आहे. 2019 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव असलेले सरपंचपद जनतेतून निवडून देण्यात आले होते.
 
यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवार नम्रता निवास गाणेकर निवडून आल्या होत्या तर यामध्ये शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस 8 व काँग्रेस आय 1 असे सदस्य निर्वाचित झाले होते. महाविकास आघाडीच्या अंतर्गत समझोत्यानुसार सरपंचपद प्रथम अडीच वर्षे शिवसेना व पुढील उर्वरित अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते. त्यामुळे नम्रता गाणेकर यांचा कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा सभापती बाबुराव चोरगे यांच्याकडे दिला आहे.
 
यापुढे आता अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीतील कोण महिला सरपंचपदी विराजमान होईल? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 2019 मध्ये सरपंच थेट जनतेतून निवडून आले होते; परंतु राज्य सरकारच्या निर्णयामध्ये आता बदल झाल्याने पुढील सरपंच हे सदस्यातून निवडले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ना.मा. प्रवर्गातील 4 महिला आहेत. यामध्ये ज्योती दिपक परकर, प्रियांका श्रीप्रसाद मुरकर, समिधा चंद्रकांत तोडणकर व प्रिया मंगेश पाटील यांचा समावेश असून, सरपंचपद कोणाला मिळते? याकडे बोर्लीकरांचे लक्ष आहे.
 
बोर्लीपंचतनच्या विकासासाठी निस्वार्थपणे धडपडणार्‍या, उत्तम पाठबळ असणार्‍या व यातून महाविकास आघाडीतील पक्षांचे नाव उंचावेल अशी कामगिरी करु शकेल, अशा सदस्याकडे सरपंच द्यावे, अशी पक्षीय कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चार महिला सदस्य असणार्‍यांपैकी कोणाकडे पक्ष जबाबदारी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर आपल्याला सरपंच मिळावे, यासाठी अंतर्गत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.