पुन्हा एकदा घडले माथेरानकरांच्या प्रामाणिकपणाचे दर्शन!

पर्यटकाचे सापडलेले पैशांचे पाकीट केले परत

By Raigad Times    13-Sep-2021
Total Views |
Matheran_Honesty_1 &
 
उन्मेष दाभेकर यांची कौतुकास्पद कामगिरी
 
माथेरान । माथेरानमधील पेमास्टर उद्यान परिसरात सापडलेले पैशांचे पाकीट पर्यटकाला परत करत, माथेरानच्या उन्मेष दाभेकर यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. याचबरोबर बाहेरुन माथेरानमध्ये फिरायला येणार्‍या पर्यटकांमध्ये माथेरानची प्रतिमाही उंचावली आहे.
 
माथेरानमधील स्थानिक लोक आजही आपला व्यवसाय आणि व्यवहार अत्यंत इमानदारी आणि विश्वासाने करत असल्याने इथे येणारे पर्यटक हे निर्धास्तपणे येत असतात. रविवारी (12 सप्टेंबर) गणेशोत्सवाच्यानिमित्ताने येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उन्मेष सतीश दाभेकर हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा नगरपरिषदेचे गटनेते, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्यासोबत विविध भागात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी निघाले होते.
 
पेमास्टर उद्यान परिसरात दाभेकर यांना एक काळ्या रंगाचे पैशांचे पाकीट निदर्शनास आले. या पाकीटामध्ये काही रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे, बँकेचे विविध कार्ड्स होते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता प्रसाद सावंत यांनी संबंधित पर्यटकास त्या कार्डावरील मोबाईल नंबरद्वारे संपर्क साधण्यास उन्मेष दाभेकर यांना सांगितले.
 
दाभेकर यांनी संपर्क साधला, तेव्हा मुंबई येथील पर्यटक अमर सिंग हे पाकीट गहाळ झाल्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर होते. अमर सिंग यांना पाकीट सापडल्याची माहिती देऊन, सदरचे पाकीट त्यांना सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे अमर सिंग यांना खूपच आनंद झाला. त्यांनी प्रसाद सावंत आणि उन्मेष दाभेकर यांचे आभार मानले.
 
इथल्या स्थानिकांमध्ये आजही अबाधित असलेली इमानदारी पाहून ते भारावून गेले. यावेळी पत्रकार मुकुंद रांजाणे, रोहित साबळे हेही उपस्थित होते. दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी असेच गुजरात येथील रितेश धु्रव या पर्यटकाचा प्रवासादरम्यान टॅक्सीत विसरलेला 80 हजारांचा महागडा मोबाईल येथील टॅक्सी चालक अन्वर पालटे यांनी कुरिअरद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवून, प्रामाणिकपणा दाखविला होता.