अलिबाग । अलिबाग शहरात एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्या आहेत. शहरातील ओमसागर आणि शिवम या दोन सोसायट्यांमध्ये या घरफोड्या झाल्या असून, दीड ते पावणेदोन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. गणपतीसाठी गावी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री ह्या घरफोड्या झाल्या आहेत. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान चोरांनी ही बंद घरे फोडली. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.
अलिबाग शहरातील ब्राह्मणआळी येथील ओमसागर सोसायटीमध्ये 4 आणि शिवम सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये 2 अशी एकूण 6 घरे चोरट्यांनी फोडली आहेत. या घरांमधील लोक गणपतीसाठी गावी गेले होते. हीच संधी साधत चोरांनी या बंद घरांचा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. जवळपास दीड ते पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व घरफोड्यांची पद्धत सारखीच असून, यामध्ये 3 ते 4 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी ते बंद अवस्थेत असल्याने, तपासामध्ये अडचणी येत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहांगे व त्यांची टीम करत आहे.
-------------------------------------
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
गणपतीसाठी गावी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांमध्ये या घरफोड्या झाल्या आहेत. ज्या घरांमध्ये घरफोड्या झाल्या आहेत त्यांच्या दरवाजांना ब्रासचे कडी-कोयंडे होते. जे साध्या स्क्रूड्रायव्हरनेही सहज तुटतात. तसेच लॅच असूही ते लावलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी ब्रासऐवजी मजबूत कडी-कोयंडे बसवावेत आणि लॅचचा वापर करावा. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत.
- श्री. लहांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे
-------------------------------------
चोंढी येथेही घरफोडी
तालुक्यातील चोंढी येथे गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री घरफोडीची घटना घडली. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते 10 सप्टेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली. फिर्यादी (रा.चोंढी ता.अलिबाग ह्या त्यांच्या चोंढी येथील घराला कुलूप लावून बहिणीकडे गेल्या होता.
त्या घरी परत आल्या तेव्हा घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उपकून, लॉक तोडण्यात आले होते. आत जाऊन पाहिले असता, घरातून 5 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम चोरला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पाटील हे करीत आहेत.